आता महाराष्ट्रातील होमगार्डसना मिळणार 50 लाख रुपयांचा वैद्यकीय विमा


मुंबई : आतापर्यंत पोलिसांचा वैद्यकीय विमा काढला जायचा. मात्र ही सुविधा होमगार्डसाठी नव्हती. आता होमगार्ड्सनाही 50 लाख रुपयांच्या वरचा वैद्यकीय विमा मिळणार आहे. डीजी होमगार्ड डॉ. भूषण उपाध्याय यांनी शुक्रवारी सांगितले की, यासाठी अनेक श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. जर एखाद्या होमगार्डचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची विम्याची रक्कम मिळेल. याशिवाय कुटुंबाला इतर मानधन म्हणून 20 लाख रुपये आणि मुलांच्या शिक्षणासाठी 4 लाख रुपये वेगळे मिळतील. कोणत्याही कारणामुळे कायमचे अपंगत्व आल्यास, होमगार्डला 50 लाख रुपये वैद्यकीय विमा म्हणून मिळतील. उपचारासाठी 10 लाख रुपयांचा वैद्यकीय विमा असेल.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांनी यासाठी एचडीएफसी बँकेशी करार केला आहे. यामध्ये होमगार्ड किंवा सरकारला प्रीमियम म्हणून एक रक्कमी पैसे बँकेत जमा करावी लागणार नाही. बँकेत होमगार्ड खाते असणे पुरेसे आहे. पोलिसांसारख्या कायमस्वरूपी नोकऱ्यांअभावी होमगार्डना आजवर या सुविधा मिळाल्या नाहीत.