अमरनाथ यात्रा- मुस्लीम बांधव सुद्धा भाविकांच्या प्रतीक्षेत

दोन वर्षांच्या करोना काळानंतर यंदा जम्मू काश्मीर मध्ये अमरनाथ यात्रा ३० जून पासून सुरु होत असून अमरनाथ श्राईन बोर्डाने आणि जम्मू काश्मीर प्रशासनाने यात्रेसाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. केवळ हिंदूच नाही तर मुस्लीम बांधव सुद्धा हिंदू भाविकांच्या प्रतीक्षेत असून बाबा बर्फानीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या स्वागतास आतुर आहेत असे दिसून येत आहे. यात्रेच्या सुरवातीच्या ठिकाणापासून ते अमरनाथ गुहेपर्यंतच्या सर्व मार्गावर यात्रेकरूंसाठी हॉटेल्स, टेंटस, वैद्यकीय सुविधा, लंगर, घोडे, पालख्या सज्ज झाल्या आहेत. गेली दोन वर्षे ही यात्रा न झाल्याने वर्षभराची कमाई याच यात्रेवर अवलंबून असणारे सर्व प्रकारचे व्यावसायिक यंदा यात्रेकरूंची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

या संदर्भात येथील घोडे, पालख्या व्यावसायिक मुस्लीम बांधव म्हणाले, आम्ही भाविकांची वाट पाहत आहोत. काश्मीर मधील पाहुणचार जगभरात प्रसिध्द आहे. घोडे, पिटू, पालख्या मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. अमरनाथ यात्रा मार्गावर अनेक ठिकाणी टेंट सिटी उभारल्या गेल्या असून ७० हजार प्रवाशांची सोय त्यात होणार आहे. शिवाय आधार शिबिरे आहेत. त्यामुळे एकूण दीड लाख भाविक एकावेळी यात्रामार्गावर राहू शकतील.

यंदा प्रथमच श्रीनगर पहलगाम आणि नीलगाम साठी हेलिकॉप्टर सेवा सुरु झाली असून त्यामुळे एका दिवसात बर्फानी बाबाचे दर्शन घेऊन पुन्हा मुक्कामी येता येणार आहे. या बुकिंगला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. डीआरडीओने यात्रा मार्गावर हॉस्पिटल सेवा दिली आहे आणि संपूर्ण मार्गावर अर्धसैनिक बलाचे जवान भाविकांच्या संरक्षणासाठी तैनात आहेत. संपूर्ण मार्गावर वीज आणि पाण्याची सुविधा केली गेली आहे. यंदा सुमारे साडेतीन लाख भाविक अमरनाथ दर्शनाला येतील असा अंदाज आहे.