अमेरिकेत मिळेनात पॉपकॉर्न तर जर्मनीत बियरची टंचाई

करोनाने जगभर महागाईचा भडका उडविला आहेच पण करोना लॉकडाऊनचे आफ्टर इफेक्ट सध्या अधिक तीव्र स्वरुपात पुढे येऊ लागले आहेत. पेट्रोल डीझेलच्या टंचाईला भारत सामोरा जात आहे तर जपान मध्ये कांदा लोकांना रडवितो आहे. कुठे सॉस मिळत नाही तर कुठे कंडोम महागले आहेत. अमेरिकेत अतिशय लोकप्रिय असलेले पॉपकॉर्न दिसेनासे झाले आहेत. सिनेमा हॉल मध्ये जायचे म्हणजे पॉपकॉर्न हवेतच पण तेथेही त्यांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. बियर साठी फेमस असलेल्या जर्मनीत बियरची चणचण आहे आणि या साऱ्यामागे करोना मुळे लागलेला लॉकडाऊन हे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्लुमबर्गच्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनचा सर्वात वाईट परिणाम सप्लायचेन म्हणजे पुरवठा साखळीवर झाला आहे. सध्या जगभर सप्लाय चेन वर प्रचंड दबाव आहे. यामुळे एखाद्या उत्पादनासाठी कच्चा माल मिळत नाही तर कुठे पॅकिंग मटेरियलची अडचण आहे. जर्मनीत बियर मुबलक आहे पण पॅकिंग साठी काचेच्या बाटल्या किंवा अल्युमिनियम कॅन मिळत नाहीत. यामुळे येथे बियरच्या किंमती वाढल्या आहेत.

ऑस्ट्रेलियात लेट्युस, जपान मध्ये कांदा आणि सलामी यांची चणचण आहे. शिपिंग कंटेनरची संख्या कमी पडते आहे. अमेरिकेत लोकप्रिय सिरचा सॉस दुर्मिळ झाला आहे कारण या सॉसच्या बड्या ब्रांडने कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने उत्पादन बंद केले आहे. पॉपकॉर्नची हीच परिस्थिती आहे. पॅकिंग सामान उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनी मका उप्तादन कमी केले आहे आणि त्याची परिणीती पॉपकॉर्न टंचाई मध्ये झाली आहे.