म्हाडाच्या घरांसाठी प्रतीक्षा करण्याची गरज नाही, लवकरच निघणार नवीन उत्पन्न स्लॅबसह लॉटरी


मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) लॉटरीत नाव आल्यानंतरही विजेत्यांना वर्षानुवर्षे घरासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मुंबईतील आगामी म्हाडाच्या सोडतीतील विजेत्यांना घरांचा ताबा मिळण्यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. मुंबईतील 2683 घरांचे बांधकाम म्हाडाकडून फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. लोकांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाकडून गोरेगावमध्ये 5 हजार घरे बांधली जात आहेत. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगावमध्ये 2683 घरांच्या बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही घरे फेब्रुवारी 2023 पर्यंत लोकांना ताब्यात देण्यासाठी तयार होतील.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिवाळीपर्यंत मुंबईतील म्हाडाच्या तीन हजार घरांची लॉटरी काढण्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत घराचा ताबा कधी मिळणार, याची चिंता लोकांना सतावू लागली. मात्र म्हाडाच्या लॉटरी विजेत्यांना घरांच्या चाव्या मिळण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.

गोरेगावमध्ये प्रत्येक वर्गातील नागरिकांसाठी म्हाडाकडून घरे बांधली जात आहेत. गोरेगावमध्ये म्हाडाकडून 322 चौरस फूट, 482 चौरस फूट, 785 चौरस फूट आणि 978 चौरस फुटांची घरे बांधण्यात येत आहेत. लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा गोरेगाव येथील 18 एकर परिसरात 5000 घरे बांधत आहे. 5 हजार घरांपैकी सुमारे 3 हजार घरे पुढील वर्षाच्या सुरुवातीला तयार होतील.

वाढला उत्पन्नाचा स्लॅब
म्हाडाच्या घरांच्या अर्जासाठी आता उत्पन्नाच्या स्लॅबची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तसेच घरांचा आकारही निश्चित करण्यात आला आहे. सर्वात कमी उत्पन्न गटासाठी (EWS), आता 6 लाख उत्पन्न असलेले अर्ज करू शकतील, जे आधी रुपये 3 लाख होते. हे घर आता 322 स्क्वेअर फुटांचे असेल.

श्रेणी वार्षिक उत्पन्न क्षेत्र

  • EWS 6 लाख 322 चौरस फूट
  • LIG 9 लाख 645 चौरस फूट
  • MIG 12 लाख 1722 चौरस फूट
  • HIG 12 लाख+ २१५२ चौरस फूट