अश्या होतात रेव पार्टीज

बंगलोर येथे सुरु असलेल्या एका रेव पार्टीत बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा भाऊ सिद्धांत याला रविवारी पोलिसांनी अटक केल्याची बातमी आल्यानंतर पुन्हा एका या रेव पार्टी चर्चेत आल्या आहेत. देशातील मोठमोठ्या शहरात रेव पार्ट्या ही आता सर्रास रुळलेली बाब झाली असून श्रीमंत घरातील तरुणांना अश्या पार्ट्यांची चटक लागलेली दिसत आहे. जेव्हा अश्या बेकायदा पार्ट्यांवर कधी पोलीस धाडी घालून तेथील मुला मुलीची धरपकड करतात तेव्हा त्या विषयी चर्चा सुरु होते आणि कालांतराने मागे पडते.

या रेव पार्टीज पुणे, मुंबई, दिल्ली, लखनौ, जयपूर, बंगलोर अश्या बड्या शहरात कधी हॉटेल्स मध्ये तर कधी फार्म हाउसेस अथवा रिसोर्ट मध्ये होतात. तेथे एका रात्रीत लाखो रुपयांचा चुराडा केला जातो. बड्या घरातील मुले महागड्या गाड्यातून येतात आणि यात मुलींचे प्रमाण सुद्धा वाढते आहे. पूर्ण रात्रभर नाच, नशा, मौजमस्ती, अमली पदार्थ सेवन आणि स्वैराचार ही यातील मुख्य आकर्षणे असतात.

रेव पार्टी मधून प्रामुख्याने दोन प्रकारचे अमली पदार्थ सेवन केले जातात. अॅसिड आणि एक्सटसी नावाच्या या दोन्ही पदार्थांवर भारतात बंदी असून त्यांची विक्री आणि सेवन हा गुन्हा आहे. मात्र या ड्रग मुळे आठ आठ तास नाचण्याची गुंगी मिळते असे सांगतात. हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी नुकसानकारक आहेत मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाकडून त्याचे सेवन केले जाते. विशेष म्हणजे अतिशय महाग अशी ही ड्रग अश्या पार्ट्या मधून सहज उपलब्ध होतात. ज्यांना ती परवडत नाहीत त्यांच्यासाठी हशीश, गांजा, दारू यांची व्यवस्था असते.

या पार्ट्या गुप्तपणे आयोजित केल्या जातात. व्हॉटस अप ग्रुपवरून त्यांचे निरोप दिले घेतले जातात. काही दिवसांपूर्वी दोन आयपीएल खेळाडू सुद्धा अश्या पार्टीत पकडले गेले होते. सर्वसामान्य लोकांना येथे जागाच नाही. २०,३०,६० हजार वॉटचे म्युझिक एक प्रकारची झिंग आणते. आजकाल रेव व्हेन्यू मध्ये हटस म्हणजे वेगळ्या झोपडीवजा जागा सुद्धा उपलब्ध केल्या जातात जेथे तरुण तरुणी स्वैराचार करू शकतात.