दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीत, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी गुन्हा दाखल


साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन यापूर्वी त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. या अभिनेत्याच्या चित्रपटाला देशभरात चांगलीच पसंती मिळाली होती. या चित्रपटातील अल्लूचा अभिनय आणि धमाकेदार डान्स मूव्ह्सचे सर्वांनी कौतुक केले. या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, नुकतीच अभिनेत्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका शैक्षणिक संस्थेला पाठिंबा दिल्याने साऊथच्या सुपरस्टारला टीकेला समोरे जावे लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते कोठा उपेंद्र रेड्डी यांनी दावा केला की संस्थेची विशेष जाहिरात, ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा चेहरा वापरण्यात आला होता, ती दिशाभूल करणारी होती आणि चुकीची माहिती देणारी होती. अशा स्थितीत अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

अल्लू अर्जुन याने जाहिरातीत दिसल्याबद्दल आणि श्री चैतन्य शैक्षणिक संस्थांविरुद्ध खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी अंबरपेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच अल्लू अर्जुन आणि श्री चैतन्य शैक्षणिक संस्थांवर लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी खटला चालवावा, अशी विनंती कोठा उपेंद्र रेड्डी यांनी केली. एखाद्या जाहिरातीमुळे अभिनेत्यावर टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वी अल्लू अर्जुनला फूड डिलिव्हरी अॅपच्या मार्केटिंगसाठी टीकेला सामोरे जावे लागले होते. एवढेच नाही तर सरकारी परिवहन सेवेकडे दुर्लक्ष करून बाईक अॅपची जाहिरात केल्याप्रकरणीही त्याला ताकीद देण्यात आली होती.

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर, साऊथ सुपरस्टार शेवटचा त्याच्या पुष्पा द राइज चित्रपटात दिसला होता. दुसरीकडे, त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलताना अल्लू अर्जुन लवकरच पुष्पा: द रुल या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करणार आहे. याशिवाय त्याच्याकडे वेणू श्रीराम सोबत आयकॉन आणि कोरटाला शिवा, एआर मुरुगाडोस, बोयापती श्रीनू आणि प्रशांत नील यांच्यासोबत प्रत्येकी एक चित्रपट आहे.