भारतात प्राण्यांसाठी पहिली स्वदेशी करोना लस सादर

प्राण्यांसाठी देशातील पहिल्या स्वदेशी लसीचे लाँचिंग केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते गुरुवारी व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले गेले आहे. अॅनोकॉवॅक्स या नावाने ही लस उपलब्ध केली जात आहे. हरियानाच्या आयसीएआर, नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एक्विंसने ही लस विकसित केली आहे.

ही लस विकसित करताना निष्क्रिय सार्स कोव २च्या डेल्टा व्हेरीयंटचा वापर केला गेला आहे मात्र कोविडच्या डेल्टा आणि ओमिक्रोन अश्या दोन्ही व्हेरीयंटपासून ही लस प्राण्यांना संरक्षण देऊ शकेल असे सांगितले गेले आहे. कुत्री, सिंह, तरस, उंदीर, ससे या प्राण्यांसाठी सुद्धा ही लस सुरक्षित आहे. या उद्घाटन प्रसंगी बोलताना तोमर म्हणाले, वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमातून ही लस विकसित झाली आहे आणि हे यश फार मोठे आहे.

देशाचा करोना प्रतिबंधक लस आयात करण्यापेक्षा स्वदेशी लस विकसित करण्यावर अधिक भर आहे. करोनाच्या माणसांसाठीच्या लसी सुद्धा भारतात विकसित केल्या गेल्या आणि त्या कमालीच्या यशस्वी ठरल्या आहेत. प्राण्यांसाठीची लस सुद्धा यशस्वी ठरेल आणि त्यामुळे देशातील पशुधनाचा करोना पासून बचाव करणे शक्य होईल असा विश्वास वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.