चीनच्या वेगाने घटत्या लोकसंख्येमागे करोना कारण?

गेल्या दोन दशकात चीनची लोकसंख्या ज्या वेगाने कमी झाली त्यापेक्षा अधिक वेगाने २०२१ मध्ये कमी झाल्याचे नव्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. चीनच्या सांखिकी विभागाने जारी केलेल्या नव्या आकडेवारी नुसार चीन मध्ये जन्मदर ०.७५२ तर मृत्युदर ०.७१८ टक्के असून गेल्या वर्षात म्हणजे २०२१ मध्ये लोकसंख्येत फक्त ४ लाखाने वाढ झाली आहे. यामागे करोना हे एक कारण असावे असे मत व्यक्त केले जात आहे. चीन कम्युनिस्ट सरकार मात्र लोकसंख्येत होत असलेल्या घटीमुळे चिंतेत पडले आहे.

नव्या निरीक्षणात असे दिसले आहे कि चीनच्या १० प्रांतीय स्तरावर लोकसंख्या गेल्या वर्षात अधिक कमी झाली आहे. अर्थात गेल्या दोन दशकात सरकारी धोरणांमुळे लोकसंख्या घटली होतीच पण त्याचे तोटे लक्षात येताच गेल्या दोन वर्षात सरकारने कुटुंब नियोजन कायद्यात बदल करून तीन मुले जन्माला घालण्याची सवलत नागरिकांना दिली. मात्र करोना संकट आणि एकूणच लग्नाऊ मुलींची चणचण यामुळे तरुण पिढी मुले जन्माला घालण्यास उत्सुक नाहीत असे दिसून आले आहे. यामुळे सरकार समोर अडचण निर्माण झाली आहे.

या अगोदरच्या जनगणनेत चीनची लोकसंख्या १ अब्ज ४१ कोटी,१२ लाख २१२ होती २०२१ मध्ये त्यात फक्त चार लाखाची नवी भर पडली असल्याचे सांखिकी विभागाने जाहीर केले आहे.