काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह, गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांमध्ये सहभागी अनेक नेत्यांनाही लागण


नवी दिल्ली – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुरजेवाला म्हणाले की, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुरजेवाला यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांना सौम्य ताप आणि काही लक्षणे होती. कोविड चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुरजेवाला पुढे म्हणाले की, सोनिया गांधींनी स्वतःला वेगळे केले आहे. त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत.

अनेक नेते कोरोना पॉझिटिव्ह
रणदीप सुरजेवाला यांनी पुढे सांगितले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गेल्या एका आठवड्यात अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेतली, त्यापैकी अनेकजण कोविड पॉझिटिव्ह आढळले. त्यांनी 8 तारखेला ईडीसमोर (अंमलबजावणी संचालनालय) हजर राहावे, असे काँग्रेस अध्यक्षांनी मला विशेष सांगितले आहे. 8 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात ही चौकशी होणार आहे. सुरजेवाला म्हणाले की, सोनिया गांधी दोन-तीन दिवसांत बरे होण्याची अपेक्षा आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने बजावले सोनिया आणि राहुल यांना समन्स
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ईडी 8 जून रोजी सोनियांची चौकशी करेल, तर राहुल यांना गुरुवारी हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, राहुल सध्या देशात नसल्यामुळे 5 जून नंतरची तारीख ठेवण्याची विनंती त्यांनी तपास यंत्रणेला केली आहे.