चलईवेती


आपले हृदय आपल्याला काहीतरी सांगत असते. पण आपण त्याकडे लक्षच देत नाही. कधी कधी आपण आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या हृदयावर जादा भार टाकतो. त्यातला जास्तीत जास्त भार सहन करण्याचा प्रयत्न ते करते परंतु अती झाल्यावर मात्र ते आपल्याला इशारा देते. तो इशाराही ऐकला नाही तर मात्र हृदयाचा कडेलोट होऊ शकतो. हृदय आपल्याला सांगते की तुम्ही रोज एक तास माझ्यासाठी चाला. मी तुमच्यासाठी जन्मभर चालेन. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हृदयाने आपल्यासाठी जन्मभर चालावे अशीही अपेक्षा करतो. पण हृदयासाठी एक तास चालण्याचे पथ्य आपण पाळत नाही. त्यामुळे पुढे पुढे हृदय आपल्याला साथ देईनासे होते. म्हणून डॉक्टर मंडळी नेहमी सांगत असतात की, हृदयाच्या म्हणणे ऐकायला शिका.

टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकाने या संबंधात एक मोहीम सुरू केलेली आहे. त्या मोहिमेचे नाव आहे वॉक फॉर लाईफ. चांगले जगण्यासाठी चाला. या मोहिमेत त्यांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरु इत्यादी शहरांमध्ये हजारो लोकांना पहाटेच्यावेळी भरपूर चालण्यास उद्युक्त केले आहे. २०१२ साली ही मोहीम सुरू झाली. आजपर्यंत तिच्यात १ लाख भारतीयांनी भाग घेतला आहे आणि चालण्याच्या सर्वात सोप्या व्यायामाचे उत्तम उपयोग अनुभवले आहेत. या उपयोगांना जागतिक आरोग्य संघटनेनेही दुजोरा दिलेला आहे.

दररोज साधारण एक तास चालणार्‍या लोकांना हृदयरोग सतावत नाही. टाईप टू डायबेटिस, अस्थमा, कर्करोग यांची शक्यता कमी होते. विशेषतः महिलांना हा अनुभव चांगला येतो. ज्या महिला नियमाने सकाळी १ तास वेगाने चालतात त्यांच्या आयुष्यात स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. अमेरिकी कॅन्सर सोसायटी या संघटनेने या संबंधात काही प्रयोग केले आहेत. ज्या महिला आठवड्यातून ७ किंवा त्यापेक्षा अधिक तास चालत असतील त्यांच्या बाबतीत कर्करोगाची शक्यता जवळजवळ शून्यच असते. त्यामुळे दररोज पहाटे उठून किमान अर्धातास चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. विशेष म्हणजे चालण्याच्या व्यायामाला पैसा लागत नाही, कसलीही साधने वापरावी लागत नाहीत. एकटाच माणूस चालू शकतो. कोणीतरी सोबत असलेच पाहिजे असे काही नाही. तेव्हा पहाटे उठा आणि चालायला लागा. हे चालणे आपल्या आरोग्यात अनपेक्षित आणि चमत्कारिक बदल घडवून आणू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment