अशी ठरते विमानप्रवासाच्या तिकिटांची किंमत

air
आपल्याला जर प्रवासासाठी जायचे असेल, तर त्या ठिकाणी जाण्यासाठी विमान प्रवास हा आजकालच्या काळामधला सर्वात सोयीचा आणि वेळेची बचत करणारा पर्याय ठरत आहे. पण काही वेळा विमान प्रवासाची तिकिटे आरक्षित करणे हे मोठे त्रासदायक काम ठरू शकते. इंटरनेटचा वापर करून, भरपूर वेळ खर्ची घालत निरनिराळ्या वेबसाईटस् पडताळून पहिल्या तरी तिकिटांच्या योग्य किंमती दिसतीलच असे नाही. विशेषतः सुट्टीच्या दिवसांमध्ये ही समस्या जास्तच भेडसावते. अश्या वेळी तिकिटांच्या किंमती भरमसाट, काही वेळा तर अगदी दुप्पट किंमती देखील पाहायला मिळतात.
air1
विमान प्रवासाच्या तिकीटाची किंमत अनेक गोष्टींवरून ठरविली जात असते. यामध्ये विमान प्रवासाचा मूळ दर, म्हणजेच बेस फेअर, इतर कर, विमानतळावर विमान उतरविण्यासाठी, उड्डाण करण्यासाठी आणि मधल्या वेळामध्ये पार्क करण्यासाठी विमान कंपनीला भरावी लागणारी फी, म्हणजेच एअरपोर्ट फी, इंधनासाठी भरावा लागणारा दर, विमानप्रवासाच्या दरम्यान दिले जाणारे खाद्यपदार्थ, प्रवाश्यांनी निवडलेल्या सीट्स आणि प्रवासी बरोबर नेत असलेले बॅगेज हे सर्व चार्जेस तिकिटाच्या किंमतीमध्ये समाविष्ट असतात. कमी तिकीट दर असलेल्या विमानसेवा (लो कॉस्ट एअरलाईन्स) खाद्यपदार्थ, बॅगेज, आणि सीटच्या निवडीसाठी वेगळे दर आकारीत नसल्यामुळे या विमानसेवांचे दर इतर विमानसेवांच्या मानाने कमी असतात.
air2
तिकिटांचे दर ठरविण्यापूर्वी, विमान कंपनी विशिष्ट प्रवासासाठी कोणते विमान वापरले जाणार आहे हे ठरविते. त्यानुसार विमानामध्ये किती सीट्स उपलब्ध असून, किती प्रवासी प्रवास करू शकतील याचा नेमका अंदाज घेणे शक्य होते. तसेच या सीट्स वेगवेगळ्या वर्गांमध्ये विभागलेल्या असतात. बिझिनेस किंवा एक्झिक्युटिव्ह क्लासच्या सीट्सची किंमत इकॉनॉमी , म्हणजेच सर्वसाधारण सीट्सच्या मानाने अधिक असते. लो कॉस्ट एअरलाईन्स मध्ये विमानाच्या पुढील बाजूंच्या सीट्सच्या तिकीटाची किंमत अधिक असते. प्रत्येक वर्गाच्या तिकीटाची किंमत जशी वेगळी असते, त्याचप्रमाणे त्या तिकिटांना लागू होणारे नियम आणि दिल्या जाणाऱ्या सुविधाही वेगळ्या असतात. तसेच तिकिटे रद्द केल्यास तिकीटाच्या रकमेची भरपाई करण्याबाबतचे नियमही वेगवेगळे असतात.
air3
तिकिटांची किंमत ठरविताना विमान कंपन्या, त्यांना कराव्या लागणाऱ्या खर्चाव्यतिरिक्त, स्वतःच्या नफ्याचाही विचार करीत असतात. त्यामुळे प्रवासी कोणत्या प्रकारचे आहेत यावरही विमान कंपनी लक्ष देत असते. प्रवासी दोन प्रकारच्या वर्गांमध्ये विभागलेले असतात. एका वर्गातील प्रवासी केवळ सुट्टीवर जाण्यासाठी किंवा अनौपचारिक, खासगी कामांच्या निमित्ताने प्रवास करीत असतात. तर दुसऱ्या वर्गातील प्रवासी हे कामाच्या निमित्ताने प्रवास करणारे असतात. या दोन्ही वर्गांमध्ये फरक हा, की कामानिमित्त प्रवास करणाऱ्या व्यक्तींना ठराविक वेळी, ठराविक दिवशी प्रवास करणे, अगदी ऐनवेळी, कोणतीही पूर्वकल्पना नसताना देखील प्रवास करणे गरजेचे असते, तर खासगी कारणांसाठी किंवा अनौपचारिक कामासाठी प्रवास करणाऱ्या व्यक्ती तारखा आणि प्रवासाच्या वेळेच्या बाबतीत आग्रही असत नाहीत. तसेच हे प्रवासी खूप आधीपासूनच आपल्या प्रवासाच्या तारखा नक्की करीत असल्यामुळे आधीपासून तिकिटे आरक्षित करतात आणि त्यामुळे तिकिटांची किंमत कमी मोजावी लागते. मात्र कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांना प्रवासाच्या तारखा आणि वेळांच्या बाबतीत फारसे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे ऐन वेळी मिळतील त्या किंमतींमध्ये तिकिटे खरेदी केली जातात. तसेच विमान प्रवासाची तारीख जवळ येत जाईल तशी त्या विमानामध्ये उपलब्ध असणाऱ्या सीट्सच्या तिकिटांची किंमत वाढत जाते.

खरे तर प्रवासाची तारीख जवळ येत चालल्यानंतर विमानामध्ये उरलेल्या सीट्सची तिकिटे स्वस्त दरामध्ये विकली जाणे अपेक्षित असते, पण होते मात्र याच्या उलट. एखाद्या विमानातील शेवटची २०% तिकिटे महाग दरामध्ये विकून विमान कंपन्यांना अधिक नफा कमावता येतो. जर तिकिटे अगदीच विकली जात नसतील तर अश्या वेळी विमान कंपन्यांकडून काही ना काही सवलती जाहीर केल्या जातात जेणेरून तिकिटे विकली जाऊन विमान कंपनीचे नुकसान होऊ नये.

अनेकदा एकाच विमानाच्या तिकिटाच्या किंमतींमध्ये फरक दिसून येतो. या विमानाच्या तिकिटांना कितपत मागणी आहे, आणि किती सीट्स उपलब्ध आहेत, यावर ही किंमत ठरत असते. तसेच वर्षातील काही ठराविक महिन्यांमध्ये तिकिटांची उपलब्धता कमी असते, आणि उपलब्ध तिकीटांच्या किंमती जास्त असतात. उदाहराणार्थ दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किंवा नाताळच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करण्यास प्राधान्य दिले जात असल्याने तिकिटांच्या किंमती जास्त असतात. तसेच साप्ताहिक सुट्ट्यांना जोडून सार्वजनिक सुट्ट्या आल्या, तर त्या काळामध्येही तिकिटांची किंमत जास्त असते. आठवड्याच्या मधल्या दिवशी (मंगळवार, बुधवार, गुरुवार) या दिवशी तिकिटांची किंमत काहीशी कमी असते, तर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार या दिवशी त्याच तिकिटांची किंमत वाढलेली पहावयास मिळते.

Leave a Comment