आपल्या परंपरेने आरोग्याचे काही नियम सांगितलेले आहेत आणि ते नियम एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे जात असतात. आपण सकाळी उठून काहीही न खाता काकडी किंवा पेरू खायला लागलो तर घरातील एक वृध्द आजी आपल्याला उपाशी पोटी असे फळ खाण्यास प्रतिबंध करते. उठल्याबरोबर काकडी खाऊ नका, पेरु खाल्ल्याबरोबर पाणी पिऊ नका आणि जेवताना भरपूर पाणी पिऊ नका, असे सल्ले अशा वृध्द स्त्रिया आपल्याला देतात. परंतु तरुण पिढीचा ओढा नेहमीच असे सल्ले नाकारण्याकडे असतो आणि तरुण पिढी आजीबाईंच्या सल्ल्यांची वासलात अंधश्रध्दा म्हणून करत असते. असे असले तरी आजीबाईंचे असे सगळेच सल्ले अंधश्रध्देपोटी दिलेले असतातच असे नाही. त्यातले काही सल्ले अंधश्रध्देपोटी असतील पण बहुतेकांना शास्त्रीय आधार आहे.
फळांनंतर पाणी पिणे घातक
जेवताना किंवा जेवल्याबरोबर पाणी पिऊ नये असा नियम आहे. जेवणापूर्वी अर्धा तास आणि जेवणानंतर अर्धा पाऊण तास पाणी पिऊ नये. कारण जेवणाने आपल्या पोटात अन्न गेलेले असते किंवा जेवणापूर्वी पोटातला पाचक रस पाझरत असतो. अशा अवस्थेत आपण पाणी पिले तर जेवणापूर्वीच्या पाण्याने कोठ्यातला सगळा पाचक रस धुवून निघतो आणि नंतर खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी पोटात पाचक रस शिल्लक राहत नाही. अशीच गोष्ट जेवणानंतर घडते. आपण जेवण केले की पोटात गेलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी पाचक रस त्यात मिसळायला लागतो आणि अशावेळी आपण पाणी पिले की हा पाचक रस पातळ होतो आणि खाल्लेले अन्न पचन होत नाही. म्हणून जेवणापूर्वी अर्धा पाऊण तास आणि जेवणानंतर अर्धा पाऊण तास पाणी पिऊ नये.
काही फळांनंतरसुध्दा पाणी पिऊ नये असे सांगितले जाते. विशेषतः काकडी, पेरु, टरबूज, खरबूज या फळांचे सेवन केल्यानंतर पाणी पिण्यास मज्जाव केला जातो. कारण मुळात आपण जी फळे खाल्लेली असतात त्या फळात भरपूर पाणी असते आणि त्यांच्या सेवनानंतर भरपूर पाणी पिले की पोटातल्या पाण्याचे प्रमाण वाढते आणि या वाढलेल्या अतिरेकी पाण्यामुळे पचन यंत्रणेतील काही रासायनिक प्रक्रिया बाधित होऊन फळाचे अपचन होते. उपाशी पोटी पपईसारखे किंवा टरबुजासारखे फळ खाऊ नये. कारण तसे केल्याने अपचन होऊ शकते. या फळांत फायबर आणि पाणी असे दोन्ही असते आणि दोन्हींच्या पचनाची प्रक्रिया वेगवेगळी असते. त्यामुळे उपाशी पोटी ही फळे खाल्ल्यास अपचन होण्याचा धोका असतो.