तणावग्रस्त महिला


निल्सन या कंपनीने विमेन ऑफ टुमारो या शीर्षकाखाली २१ देशातील महिलांचा त्या किती तणावग्रस्त आहेत या संदर्भात अभ्यास केला. या अभ्यासासाठी ६ हजार ५०० महिलांचे दैनंदिन जीवन, त्यातली त्यांची धावपळ आणि ओढाताण यांचा आढावा घेतला गेला. तेव्हा असे आढळले की २१ देशांमध्ये भारतातल्या महिला सर्वाधिक तणावग्रस्त आहेत. भारतातील १०० महिलांची पाहणी केली असता त्यातल्या ८७ महिला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विलक्षण तणावातच कार्यरत राहतात. भारताला जगाची मधूमेहाची राजधानी किंवा हृदयरोगाचे आगार म्हटले जाते. कारण या दोन विकारांना बळी पडणारे अधिकाधिक रुग्ण भारतातच आहेत. मात्र आता भारताला मुळात तणावाची राजधानी म्हणण्याची वेळ आली आहे.

नाही तरी हृदयरोग आणि मधूमेह हे दोन विकार मानसिक तणावातूनच निर्माण होत असतात. तेव्हा ज्या देशामध्ये हे दोन विकार अधिक प्रमाणात आहेत त्या देशामध्ये मानसिक तणावसुध्दा साहजिकपणेच असणार. भारतात तरी तसा तो आहे. पाहणी करण्यात आलेल्या महिलांपैकी ८२ टक्के महिलांनी आपल्याला दिवसभरामध्ये विश्रांती घ्यायला वेळच मिळत नाही असे सांगितले. तणावामुळे केवळ हृदयरोग आणि मधूमेहच होतो असे नाही तर सतत तणावाखाली राहिल्याने आपल्या रक्तातील टेलोमेरेस नावाचे एन्झाईन कमी होते. टेलोमेरेस हे एन्झाईन माणसाला तरुण ठेवत असते. म्हणजे तणावामुळे हे एन्झाईन कमी झाले की माणूस लवकर म्हातारा व्हायला लागतो.

सॅन फ्रान्सिस्कोमधील काही शास्त्रज्ञांनी तणावग्रस्त लोकांची वृध्दत्वाची लक्षणे आणि तणावमुक्त लोकांची वृध्दत्वाची लक्षणे यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता असे दिसून आले की तणावग्रस्त लोकांच्या रक्तातील टेलोमेरेस हे कमी झालेले आहेत. या पाहणीचा निष्कर्ष असा निघाला की तणावग्रस्त लोक तणावमुक्त लोकांपेक्षा दहा वर्षांनी म्हातारे दिसायला लागतात. तणावावर विजय मिळवून आनंदी जीवन जगणारा तणावमुक्त माणूस पन्नाशीतसुध्दा चाळीशीत असल्यासारखा दिसतो. मात्र तणावाने ग्रस्त असलेला चिंतातूर माणूस चाळीशीतसुध्दा साठ वर्षाच्या म्हातार्‍यासारखा खप्पड दिसायला लागतो. तणावमुक्त सदाहरित लोक साठीत आणि सत्तरीतसुध्दा कार्यरत राहतात. मनोकायिक विकारांपासून दूर राहतात आणि एक प्रकारचे आशावादी जीवन जगत असतात. ज्या गोष्टी तणावग्रस्त लोकांत आढळत नाहीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment