महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदानाचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने केला जाहीर


मुंबई – निवडणूक आयोगाने बुधवारी, 25 मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला. विधान परिषदेच्या जागांसाठी 20 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 नंतर मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशात म्हटले आहे की, 2 जून रोजी अधिसूचना जारी केली जाईल, नामांकनाची अंतिम तारीख 9 जून आहे, नामांकनांची छाननी 10 जून रोजी होईल, नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख 13 जून आहे. 22 जूनपर्यंत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सध्याच्या सदस्यांचा कार्यकाळ या वर्षी 7 जुलै रोजी संपत आहे.

288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत महाविकास आघाडीला शिवसेना (55), राष्ट्रवादी (53), काँग्रेस (44), इतर पक्ष (8) आणि अपक्ष (8) यांच्यासह 168 आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपकडे 106 आमदार असून, त्यांना जन सुराज्य आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रत्येकी एका आमदाराचा आणि पाच अपक्षांचा पाठिंबा आहे. भाजपचे एकूण 113 आमदार आहेत.

दरम्यान, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, भाजप नेते प्रसाद लाड, मराठा नेते विनायक मेटे, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या सदस्यांची मुदत संपत आहे.