उद्धव ठाकरेंच्या आणखी एका मंत्र्यावर ईडीची कारवाई, अनिल परब यांच्या सात ठिकाणी छापेमारी


मुंबई: महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारी असलेल्या दापोली भागातील जमीन व्यवहारात कथित अनियमिततेप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सात ठिकाणांवर छापे टाकले. मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने मुंबई आणि पुण्यातील सात ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत नव्याने गुन्हा दाखल केल्यानंतर दापोली, मुंबई आणि पुणे येथील ठिकाणी शोध घेण्यात येत आहे. 57 वर्षीय परब हे महाराष्ट्र विधान परिषदेत तीन वेळा शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री आहेत.

अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप
अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कारवाई परब यांनी 2017 मध्ये दापोलीमध्ये 1 कोटी रुपयांच्या मोबदल्यात जमीन खरेदी केल्याच्या आरोपाशी संबंधित आहे, परंतु ती 2019 मध्ये नोंदवण्यात आली. इतर काही आरोपांचीही एजन्सीकडून चौकशी केली जात आहे. 2020 मध्ये ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना 1.10 कोटी रुपयांना विकली गेली, असा आरोप आहे. दरम्यान, 2017 ते 2020 या कालावधीत या जमिनीवर रिसॉर्ट बांधण्यात आले.

आयकर विभागाच्या तपासातही झाले होते आरोप
रिसॉर्टचे बांधकाम 2017 मध्ये सुरू झाले आणि रिसॉर्टच्या बांधकामावर 6 कोटी रुपयांहून अधिक रोख खर्च झाल्याचा आरोप प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत यापूर्वी करण्यात आला होता. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने परब यांची यापूर्वीच चौकशी केली आहे.

याआधी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उद्धव सरकारच्या दोन मंत्र्यांविरोधातही कंबर कसली होती. त्यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा समावेश होता.