पाणी चाखून कमावतो पाण्यासारखा पैसा


न्यूयॉर्क: सध्याच्या घडीला कोण कोणत्या माध्यमातून पैसे कमवेल याचा काही नेम नाही. त्यातच आपल्या आवडीचे काम आणि त्यातच ते काम करून वर बक्कळ पैसे ही कमावता येणार असेल तर कुणाला अशी नोकरी करायला आवडणार नाही. जगभर प्रवास करून कुणी लाखो रुपये कमावतो. तर कुणी चक्क वाईन टेस्ट करून खो-याने पैसे कमावतो. पण अमेरिकेत एक असा माणूस आहे, जो खाद्यपदार्थांची नव्हे तर चक्क पाण्याची चव चाखून पाण्यासारखा पैसा कमावतो.

या माणसाचे नाव मार्टिन रिज असे आहे. आपल्याकडे दर बारा मैलावर मराठी भाषा बदलते, असे म्हटले जाते. त्याचा चालीवर दर बारा मैलावर पाण्याची चवही बदलते असेच काहीसे मार्टिनचे मत आहे. हेच लक्षात घेऊन मार्टिनने वॉटर मेन्यू तयार केला आहे. त्यामुळेच त्याला अमेरिकेतील पाटिना रेस्टॉरंट ग्रुपमध्ये वॉटर टेस्टरची नोकरी मिळालेली आहे.

दहा देशांमधून मागवलेल्या वीसपेक्षा अधिक नमुन्यांचे पाणी याठिकाणी सर्व्ह केले जाते. मार्टिन ते आधी चाखून त्या त्या देशाचेच आहे की नाही हे पाहत असतो. त्याला या कामासाठी भक्कम पगार मिळतो. वेगवेगळ्या ठिकाणांच्या पाण्याची वेगवेगळी चव त्याच्या जीभेला चटकन जाणवते. तो पाणी पिऊन अमूक पाणी अमूक देशाचे आहे असे अचूक सांगू शकतो. त्याच्या या कौशल्याने त्याला ही नोकरी मिळाली आहे.

Leave a Comment