देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदी राजीव कुमार यांची नियुक्ती


नवी दिल्ली – देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची निवड करण्यात आली. याबाबतची घोषणा केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने केली आहे. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र 14 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर राजीव कुमार नवीन मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा 15 मे रोजी कार्यभार स्वीकारतील. राजीव कुमार यांचा कार्यकाळ 15 मे 2022 ते 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत असेल. घटनेनुसार 6 वर्षे किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ असतो.

राजीव कुमार यांचे केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी अभिनंदन केले आहे. राज्यघटनेच्या कलम 324 च्या कलम (2) अंतर्गत, राष्ट्रपतींनी राजीव कुमार यांची 15 मे 2022 पासून मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. राजीव कुमार यांना माझ्या शुभेच्छा, असे रिजिजू यांनी म्हटले आहे.

जाणून घ्या राजीव कुमार यांच्याबाबत?
1984 च्या बॅचचे राजीव कुमार हे आयएएस अधिकारी आहेत. 1 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय निवडणूक आयोगाचे (ECI) निवडणूक आयुक्त म्हणून कुमार यांनी पदभार स्वीकारला. निवडणूक आयोगात पदभार स्वीकारण्यापूर्वी कुमार सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे (PESB) अध्यक्ष होते. ते एप्रिल 2020 मध्ये पीईएसबीचे अध्यक्ष झाले. 19 फेब्रुवारी 1960 रोजी जन्मलेल्या कुमार यांनी बीएससी, एलएलबी, पीजीडीएम आणि सार्वजनिक धोरणातील मास्टर केले आहे. त्यांना केंद्रीय आणि राज्य मंत्रालयांमध्ये सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वने, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रात सरकारसाठी काम करण्याचा 37 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे.