औरंगाबाद – आज औरंगाबादमधील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी दर्शन घेतले. त्यांच्यासोबत यावेळी एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, नेते वारीस पठाण हे देखील उपस्थित होते. सध्या औरंगाबाद दौऱ्यावर अकबरुद्दीन ओवेसी हे असून औरंगजेबाच्या कबरीचे त्यांनी दर्शन घेतल्यावरून सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. दरम्यान ओवेसींच्या या कृतीवर शिवसेना नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खेरे यांनी टीका केली आहे.
औरंगजेबाच्या कबरीचे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींनी घेतले दर्शन
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगतिले की, एका राजकीय पक्षाचे अकबरुद्दीन ओवेसी हे नेते आहेत. ते येथे मोफत शाळा सुरू करत आहेत, मला नाही वाटत कोणत्या राजकीय पक्षाने असा काही उपक्रम सुरु केलेला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हैदराबादहून येणे आणि औरंगाबादेत मोफत शाळा सुरू करणे, जी सर्व जाती-धर्माच्या मुलांसाठी असणार आहे. मला असे वाटते की दुसऱ्या राजकीय पक्षांनी यातून काही तरी शिकायला पाहिजे. तसेच हैदराबाहून येऊन औरंगाबादेत अकबरुद्दीन ओवेसी एक मोफत शाळा सुरू करू शकतो, तर शिवसेनेने अशी घोषणा करावी की ते जर एक करू शकत असतील, तर आम्ही दोन करू. भाजपने सांगितले पाहिजे की आमचे दोन मंत्री आहेत, तर आम्ही अशा चार शाळा सुरू करणार आहोत आणि ज्यांना केवळ अजान ऐकू येते, त्यांनी देखील किमान एक शाळा सुरू करण्याबाबत बोलावे. कारण, देशाला राज्याला आज शिक्षणाची खूप आवश्यकता आहे आणि एक चांगला उपक्रम ते आज औरंगाबादेत सुरु करत आहेत.
तसेच, अनेक महापुरुषांचे दर्गा खुलताबादेत आहेत. खुलताबादला कोणीही गेले, तर तो औरंगजेबच्या कबरीवर जातो. यामध्ये काही वेगळा अर्थ काढण्याचे कारण नाही. धर्मानुसार तुम्हाला जिथे कबर दिसेल, तिथे उभे राहून दर्शन घ्यावे लागते, असंही जलील यांनी सांगितले. याचबरोबर, आता आमचे सगळे रंग झाले आहेत. हिरवा पण माझा, भगवा पण माझा निळा रंग देखील माझा असल्याचेही जलील यांनी यावेळी बोलून दाखवले.
तर दूसरीकडे कोणीच औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेत नाही. कारण, तो औरंगजेब एवढा दुष्ट होता की त्याने सगळ्यांनाच त्रास दिलेला आहे. त्याने हिंदुंच्या देव-दैवतांची मंदिरं तोडली, जिझिया कर लावला. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तसेत संत तुकाराम महाराजांची पालखी देखील अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचे हिंदू धर्म नष्ट करण्याचे स्वप्न होते. तो अतिशय दुष्ट राजा होता, म्हणून मुस्लीम धर्मातील लोकांनी देखील त्यांच्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवलेले नाही. तेथील अन्य दर्गावर लोक जातात, त्या दर्गा वेगळ्या आहेत, परंतु औरंगजेबाच्या कबरीवर कोणीच जात नाही. पण आता हे एमआयएमचे लोक तिथे जाऊन आले, यातून नवीनच काहीतरी राजकारण करण्याचा त्यांचा उद्देश दिसतो. ते काही बरोबर नसल्याचे चंद्रकांत खैरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.