गौतम अदानींना झटका: एका दिवसात गमावले 50 हजार कोटी, टॉप-10 यादीत सहाव्या स्थानावर घसरण


नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा झटका बसला आहे. समूह कंपन्यांच्या समभागांच्या घसरणीचा परिणाम त्यांच्या नेटवर्थवर झाला आहे. यामुळे ते आता जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत सहाव्या स्थानावर घसरले आहेत. मंगळवारी आणि बुधवारी त्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

एका अहवालानुसार, बुधवारी गौतम अदानी यांची संपत्ती 108 अब्ज डॉलरवर घसरली. 6.42 अब्ज डॉलरची (49 हजार 600 कोटींहून अधिक) घट झाली आहे. नेटवर्थमधील या मोठ्या घसरणीमुळे दीर्घकाळ अव्वल अब्जाधीशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असलेला अदानी आता सहाव्या क्रमांकावर घसरले आहेत. मंगळवारीही त्यांची एकूण संपत्ती 5.19 अब्ज डॉलरने कमी झाली होती.

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहातील कंपन्यांच्या अदानी विल्मर, अदानी ग्रीन, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी एंटरप्रायझेस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स मंगळवारप्रमाणे बुधवारीही घसरले आहेत. समूह कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावरून 34 टक्क्यांपर्यंत तुटले आहेत. याचा थेट परिणाम अदानीच्या मालमत्तेवर झाला आहे.

सहाव्या क्रमांकावर असलेले अमेरिकेचे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे आता गौतम अदानी यांना मागे टाकून पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. तथापि, बफे यांना 185 दशलक्ष डॉलरचे नुकसानही सहन करावे लागले. पण हे नुकसान गौतम अदानींच्या तुलनेत खूपच कमी आहे. वॉरन बफे यांची एकूण संपत्ती सध्या $113 अब्ज आहे.

दरम्यान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्यासाठी बुधवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने घसरणीचा सामना करत असलेल्या मस्क यांनी मोठा नफा कमावला आहे. त्यांची एकूण संपत्ती $2.89 अब्जने वाढून $232 बिलियन झाली आहे. मंगळवारी एलन मस्क यांचे 18.5 अब्ज डॉलर्सचे मोठे नुकसान झाले होते.