निलेश राणेंचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, ५० वर्ष आमदार किंवा खासदार आहेत, तरी ते बेरोजगारी, शेतकरी आत्महत्येवर बोलतात. मग एवढे वर्षे काय केले?, असा सवाल निलेश राणे यांनी केला. त्यांनी शरद पवारांना ट्वीट करत लक्ष्य केले आहे.


आपल्या ट्वीटमध्ये निलेश राणे यांनी म्हटले, ४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, ५० वर्ष आमदार किंवा खासदार, अनेक संस्थांवर अध्यक्ष, तरी शरद पवार बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वगैरेवर भाष्य करतात. मग प्रश्न पडतो इतके वर्ष तुम्ही काय केले? तेव्हा काहीतरी केले असते, तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतले असते.


मुंबईची व महाराष्ट्राची सगळी कामे पूर्ण झाली आहेत, एकही काम शिल्लक नाही. म्हणून शिवसेनेचे नेते मंडळी नवनीत राणा एमआरआय मशीनमध्ये त्यांची तपासणी होताना बाहेरून फोटो कोणी काढला, हे शोधण्यासाठी स्वतः लीलावती हॉस्पिटलला गेले. हा प्रश्न महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा व गंभीर झाला असल्याचे म्हणत निलेश राणे यांनी ठाकरे सरकारलाही टोला लगावला.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारवर निलेश राणे सातत्याने टीकेची झोड उठवतात. तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक तुरुंगात असताना त्यांचा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर केल्यामुळे निलेश राणे यांनी टीका केली होती. ट्विटरवर मंत्रिमंडळ निर्णयाचा फोटो शेअर करत सरकारवर निशाणा साधला होता. २८ एप्रिल २०२२ रोजी हा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करण्यात आला होता. येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता दिल्याचा मंत्रिमंडळ निर्णय होता. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो होता.


काय शोकांतिका आहे… हे बघून हसावे की रडावे कळत नाही. दाऊदच्या हस्तकासोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक याचा निर्णय जाहीर केला असल्याचे ट्वीट निलेश राणे यांनी केले होते.