नवनीत राणांची शांत महाराष्ट्राला अशांत करण्याची विकृत मनोवृत्ती – रुपाली चाकणकर


पुणे – आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा यांच्याकडून महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना टीका केली. नवनीत राणांची शांत महाराष्ट्राला अशांत करण्याची ही विकृत मनोवृत्ती असल्याचे म्हणत त्यांनी निशाणा साधला.

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, महाराष्ट्र सध्या कोरोना महामारीमधून बाहेर पडत आहे. आपल्या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न असे मोठे प्रश्न आहेत. हा महाराष्ट्र यासाठी एकत्र येतो, लढतो आणि या लढाईच्या विरोधात जिंकतो देखील. विरोधकांनी महाराष्ट्राला सावरण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे. या महाराष्ट्रात वाद कसा निर्माण होईल, याकडे काहींचे फार लक्ष असते. त्या लोकांचे कोणते व्हिडिओ, कोणते फोटो आहेत हे मला माझ्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे वाटत नाही.

तसेच, केंद्रात नवनीत राणा या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात, जेव्हा कोरोना काळात महाराष्ट्र राज्य अडचणीमध्ये होता, तेव्हा त्यांनी असाच पुढाकार घेऊन केंद्राकडे मदतीसाठी मागणी केली असती, तर ती मागणी महाराष्ट्राच्या लोकांच्या निश्चित लक्षात राहिली असती. पण सध्या जे काही चालले आहे, ते शांत महाराष्ट्राला अशांत करायची त्यांची विकृत मनोवृत्ती असल्याचे म्हणत खासदार नवनीत राणा यांना त्यांनी टोला लगावला.

त्याचबरोबर एका महिलेने भाजपचे नेते गणेश नाईक यांच्यावर आरोप केले आहे. त्यावर महिला आयोगा मार्फत कशा प्रकारे कारवाई करण्यात येत आहे? याबाबत बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्या विरोधात पीडित महिला दोन वेळेस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेली होती. पण पोलिसांनी कोणत्याही प्रकारे तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यावर अखेर पीडित महिलेने महिला आयोगाकडे तक्रार करताच, संबधीत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश महिला आयोगाने दिले. त्यानुसार गणेश नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गणेश नाईक फरार झाले. या विरोधात न्यायालयात धाव घेतल्यावर त्यांना जामीन मंजूर झाला. पण त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने केली आहे. महिला आयोगाचे एकूणच प्रकरणावर लक्ष असून निःपक्षपाती तपास होईल. पीडित महिलेने केलेल्या मागणीनुसार कारवाई होईल, असे वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.