आता दिल्लीतील बारमध्ये मिळणार पहाटे 3 वाजेपर्यंत दारू, केजरीवाल सरकारचा निर्णय


नवी दिल्ली : लवकरच दिल्लीतील बारमध्ये पहाटे 3 वाजेपर्यंत दारू दिली जाणार आहे. दिल्ली सरकारने एक धोरणात्मक निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये बार चालकांना पहाटे 3 वाजेपर्यंत दारू विकण्याची परवानगी असेल. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारने उत्पादन शुल्क विभागाला आवश्यक निर्देश जारी केले आहेत आणि उत्पादन शुल्क धोरण 2021-22 नुसार लवकरच आदेश जारी केला जाण्याची शक्यता आहे.

ते म्हणाले की, रेस्टॉरंटमधील बार रात्री उशिरा एक वाजेपर्यंत चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही वेळ सकाळी 3 वाजेपर्यंत वाढवल्यास उत्पादन शुल्क विभाग पोलिसांसह इतर यंत्रणांसोबत काम करेल. नोव्हेंबर 2021 पासून अंमलात आलेल्या नवीन उत्पादन शुल्क धोरणात बारच्या कामकाजाची वेळ शेजारच्या शहरांच्या बरोबरीने आणण्याची शिफारस करण्यात आली आहे.

हरियाणातील एनसीआर शहर, गुरुग्राम आणि फरीदाबादमध्ये पहाटे 3 वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील नोएडा आणि गाझियाबादमधील बार रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहतात. राष्ट्रीय राजधानीत सुमारे 550 स्वतंत्र रेस्टॉरंट्स आहेत, जी उत्पादन शुल्क विभागाच्या L-17 परवान्यावर भारतीय आणि विदेशी ब्रँडची दारू विकतात. सुमारे 150 हॉटेल्स आणि मोटेल्सच्या रेस्टॉरंट्समध्ये आधीच चोवीस तास दारू पिण्याची परवानगी आहे. अशा रेस्टॉरंटना उत्पादन शुल्क विभागाकडून एल-16 परवाना दिला जातो. या निर्णयाचे स्वागत करताना, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRIA) चे अध्यक्ष कबीर सुरी म्हणाले, पॉलिसीमध्ये शिफारस केल्यानुसार बार उघडे ठेवण्याची वेळ सकाळी 3 पर्यंत वाढवावी, अशी मागणी आम्ही दिल्ली सरकारकडे केली होती.