बाळासाहेबांचा आणखी एक व्हिडीओ : राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केला जारी


मुंबई – महाराष्ट्रात हनुमान चालिसाचा वाद सुरूच आहे. त्यातच आता शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या व्हिडीओला प्रत्युत्तर म्हणून एक नवा व्हिडिओ जारी केला आहे. राज ठाकरे यांचा व्हिडिओ ‘चीप कॉपी’ असल्याचे सांगून चतुर्वेदी यांनी त्यांनी जारी केलेला व्हिडिओ खरा असल्याचे म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आपले सरकार आल्यास महाराष्ट्रातील मशिदींमधून लाऊडस्पीकर खाली आणले जातील आणि रस्त्यावर नमाज अदा करणे बंद केले जाईल, असे सांगत असल्याचे दिसत होते. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना खासदार चतुर्वेदी यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक नवा व्हिडिओ जारी केला आहे. प्रियंका चतुर्वेदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, हा मूळ व्हिडिओ आहे. सर्व स्वस्त अनुकरण करणार्‍यांसाठी हा धडा आहे, जे अनुकरण करतात, ते नेहमीच एक पाऊल नाही, तर अनेक पावले मागे असतात.


या व्हिडीओत ऐका बाळासाहेब काय म्हणतात
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या हनुमान चालिसा वादावरून राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील शब्दिक युद्ध अधिक तीव्र झाले आहे. बुधवारी राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ ट्विट करून आपण आपल्या काकांचे वैचारिक वारसदार असल्याचा संदेश दिला. त्याचवेळी, त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेनेही बाळासाहेब ठाकरेंच्या रेकॉर्डवरील दोन काउंटर व्हिडिओ जारी केले आहेत. यामध्ये बाळासाहे ठाकरे यांनी पुतणे राज ठाकरे यांना फटकारले आहे.

राज ठाकरे हे बाळासाहेबांची कॉपी असल्याचे म्हणतात. प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये ठाकरे आपल्या कॉपीवर टीका करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये बाळासाहेब म्हणतात, मला सांगण्यात आले की कोणीतरी माझ्या स्टाईलमध्ये बोलत आहे, स्टाइल ठीक आहे, पण तुमची काही विचारधारा आहे का? नुसती मराठीची ओरड करून मराठी चालणार नाही. तुम्हा सर्वांचा जन्म होण्यापूर्वी मी महाराष्ट्रात हा मुद्दा मांडला होता.