Video: मद्यधुंद महिला अधिकाऱ्याचा रस्त्याच्या मधोमध हायव्होल्टेज ड्रामा


बहराइच – बहराइचमध्ये एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, ज्या महिलेने दारूच्या नशेत गोंधळ घातला, ती अधिकारी असून जिची सध्या तैनाती गोंडा जिल्ह्यात आहे. पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून महिला अधिकाऱ्याला तिच्या पतीच्या ताब्यात दिले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ गोंडा जिल्ह्यात पोस्ट केलेल्या एका महिला अधिकाऱ्याचा आहे. हा व्हिडिओ गेल्या २७ एप्रिलचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दिवशी महिला अधिकारी लखनौहून गोंडा येथे तिच्या कारमधून येत होती. त्यावेळी ती मद्यधुंद अवस्थेत होती, असा दावा केला जात आहे. दारूच्या नशेत ती गोंडाच्या दिशेने जाण्याऐवजी बहराइचच्या दिशेने गेली आणि नंतर दुभाजकाला धडकली.

या घटनेची माहिती मिळताच जारवालरोड पोलीस घटनास्थळी पोहोचले. महिला पोलीस तिला गाडी चालवू नका, असे सांगत असताना तिने आपल्या पदाचा धाक दाखवण्यास सुरुवात केली. सुमारे तासभर हा राडा सुरू होता.


व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला कॉन्स्टेबल मद्यधुंद महिला अधिकाऱ्याला वाहनाच्या मागील सीटवर बसवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु महिला अधिकारी वारंवार बाहेर पडत आहे आणि ड्रायव्हिंग सीटवर बसण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हिडिओमध्ये महिला स्वत:ला विभागीय अधिकारी असल्याचे सांगत आयुक्तांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. वाद वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी महिला अधिकाऱ्याच्या पतीला माहिती दिली. जारवालरोड पोलिस स्टेशनचे प्रभारी राजेश सिंह यांनी सांगितले की, मद्यधुंद महिला अधिकाऱ्याला वैद्यकीय तपासणीनंतर तिच्या पतीच्या ताब्यात देण्यात आले आहे.