मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली


मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी येत्या ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवावेत, असा इशारा दिला, असला तरी मंदिरे वा मशिदींवरील भोंगे उतरविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा कोणाताही आदेश नाही. भोंगे परवानगीने लावण्यात आले असतील, तर ते काढण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही. फक्त वेळ आणि आवाजाचे बंधन पाळावे लागेल, असे स्पष्ट करीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भोंगे काढण्याची मागणी शनिवारी स्पष्टपणे फेटाळून लावली.

सर्वोच्च न्यायालायाने कोणताही आदेश मशिदी किंवा कोणत्याही प्रार्थनास्थळांवरील भोंगे हटविण्याबाबत दिलेला नाही. केवळ रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे वाजविण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे ज्या मशिदी, मंदिरांनी परवानगी घेतली असेल आणि नियमानुसार भोंगे लावले असतील, तर ते काढण्याचा प्रश्नच येत नाही, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

पूर्वपरवानगी घेतली असल्यास कोणत्याही प्रार्थनास्थळावर रात्री १० ते सकाळी ६ हा कालावधी वगळता भोंगे वाजविण्यास मुभा असेल. फक्त आवाजाची मर्यादा पाळावीच लागेल. कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही वळसे-पाटील यांनी सांगितले. अनावश्यक मुद्दे पुढे करून राज्यात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही वळसे-पाटील यांनी दिला आहे.

मनसे- भाजपकडून मशिदींवरील भोंगे उतरविण्याबाबत न्यायालयाच्या आदेशाचा दाखला दिला जातो. पण न्यायालयाने दिलेल्या निर्णयात मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत कुठेही उल्लेख नाही. केवळ रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे वाजविण्यास न्यायालायाने बंदी घातली आहे. आवाजाच्या पातळीची मर्यादाही घालून दिली आहे. त्यामुळे मशिदी किंवा मंदिरांवर भोंगे लावण्यासाठी परवानगी घेतली असेल आणि नियमानुसार ते वाजविण्यात येत असल्यास काढण्याचा प्रश्नच येत नाही, असे गृहमंत्री म्हणाले. या प्रश्नावर नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.