कोलंबो – कुठल्याही परिस्थितीत श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे हे राजीनामा देणार नाहीत आणि देशापुढील सध्याच्या प्रश्नांना तोंड देतील, असे त्या देशाच्या सरकारने बुधवारी सांगितले. राजपक्षे यांच्या देशात आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाचेही सरकारने समर्थन केले. राजपक्षे यांनी देशातील आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटावरून राजीनामा द्यावा या मागणीसाठी देशभर प्रचंड प्रमाणावर जाहीर निदर्शने झाल्यानंतर राजपक्षे यांनी आणीबाणी मागे घेतली आहे. पण श्रीलंका या संकटामध्ये असताना भारताकडून होत असणाऱ्या मदतीसंदर्भात आता तेथील अनेक मान्यवरांनी भारताचे आभार मानले आहेत. भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे माजी श्रीलंकन क्रिकेटपटू सनथ जयसूर्यानेही आभार मानले आहेत.
सनथ जयसूर्याने मानले भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार
जयसूर्याने देशातील परिस्थितीबद्दल बोलताना, या परिस्थितीमधून लोकांना जावे लागत आहे हे दुर्देवी आहे. त्यांना अशापद्धतीने जगता येणार नाही, म्हणूनच त्यांनी आंदोलनांना सुरुवात केली आहे. येथे गॅसचा तुटवडा आहे, तसेच अनेक तास वीजही नसते, असे म्हटले आहे. याच संकटातून मार्ग शोधण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे जयसूर्याने म्हटले आहे. आता लोक घराबाहेर पडत असून आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे की त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. संबंधित लोकांनी यासंदर्भातील समस्यांवर विचार करुन निर्णय घेतला नाही, तर ही अधिक गंभीर समस्या होईल. सध्या तरी याची जबाबदारी सत्तेत असणाऱ्या सरकारची आहे, असेही सनथ जयसूर्याने स्पष्टपणे म्हटले आहे.
भारताचे जयसूर्याने आभारही मानले आहेत. आम्हाला कायमच शेजारी आणि आमच्या देशासाठी एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे असणाऱ्या भारताने मदत केली आहे. भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींचे आम्ही कायमच आभारी आहोत. सध्याच्या परिस्थितीमध्ये तग धरुन राहणे आमच्यासाठी फार कठीण आहे. या संकटामधून आम्ही भारत आणि इतर देशांच्या मदतीने बाहेर येऊ अशी अपेक्षा असल्याचे सनथ जयसुर्याने म्हटले आहे.