शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे आहेत का? – इम्तियाज जलील


औरंगाबाद – अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) महाराष्ट्रातील कारवायांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. शरद पवार यांनी मोदींना यावेळी प्रामुख्याने संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीचा मुद्दा उपस्थित करत ‘ईडी’च्या कारवाया अन्यायकारक असल्याचे सांगितले. यावेळी नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित केला नसल्याचेही शरद पवारांनी सांगितले. दरम्यान संजय राऊतांच्या अटकेनंतर एवढ्या घाईने पंतप्रधानांसमोर मुद्दा उपस्थित करणाऱ्या शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा ते जास्त महत्वाचे वाटतात का? अशी विचारणा एमआयएमने केली आहे.

‘ईडी’ आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यातील मंत्री नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्याविरोधातही कारवाई केली आहे. या नेत्यांवरील कारवाईबद्दल विचारले असता, त्यांच्याबद्दल मोदींशी चर्चा केली नाही, असे पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पण, केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करणार असतील, तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारला घ्यावी लागेल, असेही पवार म्हणाले.

दरम्यान शरद पवारांनी संजय राऊतांचा मुद्दा पंतप्रधानांसोबत चर्चेस नेल्यामुळे भुवया उंचावल्या आहेत. एवढी घाई शरद पवारांनी त्यांच्या पक्षाचे नवाब मलिक अटक झाल्यानंतर का दाखवली नाही?, अशी विचारणा एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.


ट्वीट करत इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे की, फक्त संजय राऊतांबद्दल चर्चा का? तुमच्या पक्षाचेच मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली, तेव्हा तुम्हाला एवढ्या गडबडीत मोदींशी चर्चा करावीशी वाटली नाही? की संजय राऊत नवाब मलिकांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. तुमच्याकडे खेळण्यासाठी स्वतःचे खेळ आहेत.