शंकर महादेवन लवकरच गाणार ‘ब्रेथलेस हनुमान चालिसा’


२ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. राज ठाकरे यांनी या जाहीर सभेत मशिदीवरील भोंग्यांवरुन निशाणा साधला. जर मशिदीवर भोंगे वाजत असेल, तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसा आणि मशिदीवरील भोंगे यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. विविध प्रतिक्रिया याप्रकरणी उमटत असताना नुकतेच प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन यांनी एक घोषणा केली आहे.

नेहमीच काही ना काही कारणांमुळे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन हे चर्चेत असतात. ते नेहमी संगीतात विविध हटके प्रयोग करताना दिसतात. त्यांनी संगीत क्षेत्रात काही वर्षांपूर्वी ‘ब्रेथलेस’ ही नवी संकल्पना आणली आणि ती फार हिट ठरली होती. यानंतर आता लवकरच शंकर महादेवन ‘ब्रेथलेस’ हनुमान चालिसा गाताना दिसणार आहेत. याबाबतची घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे.


क्रु अॅपद्वारे याबाबतची घोषणा शंकर महादेवन यांनी केली आहे. शेमारु भक्ती या अकाऊंटवरुन शंकर महादेवन यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत ते म्हणाले, तुम्हाला सांगताना फार आनंद होत आहे की मला लवकरच अद्भुत हनुमान चालिसा गाण्याची संधी मिळाली आहे. हे गाणे मी ब्रेथलेस स्टाईलमध्येच गाणार आहे. या गाण्याचा गातानाचा वेग फार जास्त आहे. तसेच त्यातील काही शब्द हे कठीण आहे. हनुमान चालिसाचे आपल्या सर्वांच्या आयुष्यात विविध महत्त्व आहे. यामुळे आपल्याला चांगले फायदे मिळतात. त्यामुळे तुम्ही हे नक्की ऐका, असे आवाहनही शंकर महादेवन यांनी केले आहे.

शेमारु भक्ती या यु-ट्यूब चॅनलवर शंकर महादेवन यांची ब्रेथलेस हनुमान चालिसा दाखवण्यात येणार आहे. ती नक्की कधी प्रदर्शित होईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण लवकरच शंकर महादेवन यांनी गायलेली ब्रेथलेस हनुमान चालिसा लवकरच प्रदर्शित होईल, अशी चर्चा सुरु आहे.