मेट्रोचे काम बाकी असूनही ठाकरे सरकारने घातला उद्घाटनाचा घाट; शेलारांचे गंभीर आरोप


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A’या मार्गाचे लोकापर्ण करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालक मंत्री अस्लम शेख, आमदार सुनील प्रभू, रवींद्र वायकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधताना राज्य सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले. भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर टीका करत मुंबई मेट्रोचे पहिल्या दिवशीच ऑपरेशन फेल झाल्याचे सांगितले आहे. तसेच शेलारांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

पहिल्या दिवशीचे मुंबई मेट्रोचे ऑपरेशन अयशस्वी ठरले आहे. मेट्रो ट्रेन वाहतूक विलंब, कधी मेट्रो ट्रेनच रद्द, तर कधी सॉफ्टवेअर समस्या दिसून आल्या आहेत, योग्य तपास न करता मुंबई मेट्रो सुरू करण्यात आली आहे, या मेट्रोचे अजून 15 दिवस काम बाकी असतानाही ठाकरे सरकारने याच्या उद्घाटनाचा घाट घातला. मुंबईकरांचा जीव खोट्या पीआरसाठी धोक्यात घालू नका, असे ट्विटच्या माध्यमातून सांगत आशिष शेलारांनी गंभीर आरोप केले आहेत.