मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचे; शाहिद कपूरने व्यक्त केली मनातील इच्छा


शाहिद कपूर बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तो चित्रपटगृहांमध्ये येत्या काही दिवसात ‘बॅटिंग’ करताना दिसेल. ‘जर्सी’ चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी ४ एप्रिलला लॉंच झाला. यादरम्यान शाहिद कपूरसोबत चित्रपटाची स्टार कास्टसुद्धा उपस्थित होती. यावेळी चित्रपटाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देताना शाहिदने आपल्या मनातील एक इच्छा पत्रकारांसमोर व्यक्त केली आहे.

शाहिद कपूरसोबतच ‘जर्सी’ या चित्रपटामध्ये मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटामध्ये ती ‘विद्या’ हे पात्र साकारत आहे. तर शाहिद अर्जुन हे पात्र साकारेल. या ट्रेलरमध्ये अर्जुनचा क्रिकेटर बनण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तो आपल्या मुलावर खूप प्रेम करतो आणि त्याच्या डोळ्यातील आदर गमावू नये म्हणून, अर्जुन पुन्हा वयाच्या त्या टप्प्यावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरतो, ज्यात लोक निवृत्त होतात.

पत्रकारांनी शाहिदला या ट्रेलर लॉंच दरम्यान चित्रपटाचे निर्माते अल्लू अरविंद यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव विचारला. शाहिदने यावेळी आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली. शाहिद म्हणाला, मला अल्लू अर्जुनसोबतही काम करायचे आहे. मला त्याच्या हुकस्टेप्स करायच्या आहेत. तसेच, या स्टेप्स मी केल्या, तर तुम्हाला आवडेल का?, असे देखील शाहिदने पत्रकारांना विचारले. यावेळी शाहिद खूपच खुश दिसत होता.


दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक गौतम तिन्ननुरी यांनी ‘जर्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट तेलगु चित्रपट ‘जर्सी’चा रिमेक आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध तेलगु अभिनेता नानी याने प्रमुख भूमिका साकारली आहे. १४ एप्रिलला ‘जर्सी’सोबतच ‘केजीएफ २’ हा चित्रपट देखील रिलीज होणार असून शाहिद कपूर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता यशला टक्कर देऊ शकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.