आता करोनाच्या नव्या व्हेरीयंटची दहशत

जगातील अनेक देशात दहशत पसरविलेल्या करोनाच्या ओमिक्रोनवर अजून ठोस उपाय सापडले नसतानाच या विषाणूचे आणखी एक नवे व्हेरीयंट सक्रीय झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हे व्हेरीयंट ओमिक्रोन पेक्षा १० टक्के अधिक संक्रामक असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा संस्थेने केलेल्या एका अध्ययनात हे नवे व्हेरीयंट समोर आले आहे. सध्याच्या तीन हायब्रीड कोविड डेल्टा व बीए.१ कॉम्बीनेशनमधून  दोन वेगवेगळी व्हेरीयंट एक्सडी आणि एक्सएफ तर तिसरे व्हेरीयंट एक्सई बनल्याचे दिसून आले आहे.

ओमिक्रोनच्या सबव्हेरीयंट बीए.१ व बीए.२ यांच्या कॉम्बिनेशन मधून हा नवा स्ट्रेन बनला आहे. या नव्या स्ट्रेनच्या वर्तणुकीत व संक्रमणात जो पर्यंत महत्वपूर्ण बदल दिसत नाही तोपर्यंत त्याला ओमिक्रोनच म्हटले जाणार आहे. बीए.२ जगभरासाठी चिंतेचा विषय असून त्याच्या सिक्वेन्स मध्ये एक्सई स्ट्रेन सर्वप्रथम युके मध्ये १९ जानेवारीला सापडला असे सांगितले जात आहे. आत्ता पर्यंत या स्ट्रेनचे ६०० संक्रमित सापडले आहेत. हा विषाणू किती वेगाने पसरतो आणि रुग्णांसाठी किती गंभीर ठरेल याचे निष्कर्ष काढण्यासाठी अजून पुरेशी माहिती गोळा झालेली नाही. या विषाणूसाठी लस प्रभावशाली ठरेल का हे आत्ताच सांगता येणार नाही असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

दरम्यान सध्या एक्सडी व्हेरीयंट चिंताजनक वाटत आहे आणि जर्मनी, नेदरलंड आणि डेन्मार्क मध्ये तो मिळाला आहे असेही समजते.