शांघाई मध्ये करोना परिस्थिती हाताबाहेर, तैनात झाली सेना

चीन मध्ये करोना संक्रमणाचा आलेख चढतच राहिला असून देशाच्या सर्व प्रांतात करोनाने हातपाय पसरले आहेत. देशाची आर्थिक राजधानी शांघाई मधील परिस्थिती आता अधिक बिकट बनत चालली असल्याने तेथे सेना तैनात केली गेल्याचे समजते. गेल्या २४ तासात शहरात १० हजार नवे संक्रमित सापडले असून आता शहरातील सर्व २.६ कोटी नागरिकांच्या चाचण्या करण्याचे काम हाती घेतले गेले आहे. दरम्यान शहरात शुक्रवार पर्यंत कडक लॉकडाऊन लागू असून घराबाहेर पडण्यास नागरिकांना तसेच पाळीव प्राण्यांना सुद्धा बंदी केली गेली आहे.

शांघाई मध्ये २ हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी रुग्णावर उपचार करत आहेत आणि देशात सर्वाधिक संक्रमण याच शहरात झाले आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सुरु ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. रविवारी नव्या ४३८ केसेस समोर आल्या होत्या आणि ७७८८ नवे संक्रमित आढळले होते. या संक्रमितांच्या मध्ये करोनाची लक्षणे नव्हती पण चाचण्या केल्या तेव्हा त्यांना संक्रमण झाल्याचे दिसून आले होते. चीन मध्ये लसीकरण ८८ टक्के झाले आहे. हॉस्पिटल्स करोना रुग्णांनी भरलेली असून आता नव्या रुग्णांना जागा नाही हे खरे असले तरी करोनाचा एकही बळी अद्यापी नोंदविला गेला नसल्याचा दावा केला जात आहे.