शरद पवारांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा


सांगली – सातत्याने विरोधकांकडून केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारच्या धोरणांवर टीका केली जाते. भाजप नेत्यांकडून मध्यंतरी सामाजिक ऐक्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी काही वक्तव्ये वा कृती होत असल्याचा देखील आरोप केला गेला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तसेच, सांगलीत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना कर्नाटकमधील काही समाजघटकांनी अल्पसंख्याकांच्या दुकानातून खरेदी न करण्याच्या केलेल्या आवाहनावर देखील शरद पवारांनी टीका केली आहे.

कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. तिथे अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या दुकानातून साहित्य घेऊ नका, असा फतवा काही संघटनांनी काढला आहे. व्यवसाय कुणीही करू शकतो. व्यवसाय चांगला असेल, व्यवहार चांगला असेल, तर त्याचा आदर करण्याची वृत्ती आपल्या समाजात आहे. पण तो अल्पसंख्याक जातीचा आहे म्हणून त्याचा मालच घेऊन नका, अशा प्रकारची कटुता राज्य हातात असणारे घटक करायले लागले, तर सामाजिक ऐक्य कसे ठेवायचे? हा प्रश्न आमच्यासमोर असल्यामुळे या धर्मांध वृत्तींच्या विरोधात देखील आपल्याला लढाई द्यायची असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.

सध्या धर्माच्या नावाखाली देशात माणसांमध्ये अंतर निर्माण केले जात असल्याची नाराजी शरद पवारांनी यावेळी बोलून दाखवली. आज देशातील राजकारण एका वेगळ्या दिशेने जात आहे. एका वेगळ्या लोकांच्या हातात राष्ट्र आहे. अनेक कर्तृत्ववान माणसे महाराष्ट्रातही होऊन गेली. त्यांनी हा देश उभा केला. विकासाचे राजकारण केले. माणसे जोडण्याचे राजकारण केले. पण आज देशामध्ये धर्माच्या नावाने माणसांमध्ये अंतर निर्माण केले जात असल्याचे पवार म्हणाले.

त्या काळातील नेतृत्वाची महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू ही पिढी होती. स्वातंत्र्यासाठी त्यांनी कष्ट केले. त्यानंतर देश उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिले. देशासाठी जे खपले, त्यांच्याबद्दलचा आदर, सन्मान ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टीका-टिप्पणी करणे, यातच धन्यता मानणारे नेतृत्व आज दुर्दैवाने आपल्याला देशात पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.