तुम्ही पाहिलात का ‘जत्रा 2’ चा टीझर ?


२००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या जत्रा चित्रपटाने प्रेक्षकांना पोट धरून हसवले होते. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर केदार शिंदे यांनी त्यांच्या या चित्रपटाची घोषणा केली. तर कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

चित्रपटाचा टीझर कुशल बद्रिकेने शेअर केला आहे. कुशल हा मजेशीर टीझर शेअर करत म्हणाला, ह्यालगाड आणि त्यालागाडची जत्रा आनंदमयी झाली, त्याला १६ वर्षाहून जास्त काळ लोटला आहे… कोंबडी पळून सुद्धा आता बरीच वर्ष झाली आहेत.. पण अजूनही तुमचा ताब्या आमच्या राजुत आहे! म्हणूनच ह्या गुढीपाव्यानिमित्त तुम्हा सर्व रसिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येतोय.. आपलं ठरलय.. तुमच्यासाठीच ठरवल आहे.. आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी आनंदाची मेजवानी घेऊन येतोय.. ह्या नवीन वर्षात तुम्हाला हसवायला ‘जत्रा 2’ येतोय! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!अलबत्या गलबत्या कोण फोडेल, असे कॅप्शन कुशलने दिले आहे.


केदार शिंदे दिग्दर्शित आणि लिखित ‘जत्रा’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवले होते. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि क्रांती रेडेकर यांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात अजय-अतुलने संगीत दिलं होतं. या चित्रपटातील गाणी आजही सर्वांना थिरकायला भाग पाडतात. या चित्रपटातील ‘कोंबडी पळाली’ आणि ‘ये गं ये ये मैना’ ही गाणी तुफान लोकप्रिय झाली होती. यातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्याचा हिंदी रिमेकसुद्धा बनला आहे, ज्याचे बोल ‘चिकणी चमेली’ असे होते. तसेच ‘ये गं ये ये मैना’ या गाण्याचासुद्धा हिंदी रिमेक बनले आहे ज्याचे बोल ‘मेरा नाम मेरी है..’ असे होते. या अप्रतिम यशानंतर आता नववर्षात ‘जत्रा 2’ सर्वांच्या भेटीला येणार आहे.