१२वर्षाखालील मुलांना करोना लस नाही?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १२ वर्षाखालील मुलांना करोना लस देण्याची आवश्यकता नाही असा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बाबत आरोग्य मंत्रालयाने अधिकृत घोषणा केलेली नाही. देशातील सध्याची करोना परिस्थिती पाहता हा निर्णय घेतला गेल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. देशात अजून १२ वर्षाखालील मुलांचे लसीकरण सुरु झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (एनटीएजीआय)कडून १२ वर्षाखालील ज्या मुलांना गंभीर आजार आहेत त्यांनाच करोना लस दिली जावी असा सल्ला दिला आहे. सिरम इन्स्टीट्युट आणि बायोनॅशनल ई या कंपन्यांनी केंद्राकडे १२ वर्षाखालील मुलांच्या लसीसाठी मंजुरी मागितली असून या लसीच्या चाचण्यांचे परिणाम सरकारकडे दिले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने तज्ञांशी केलेल्या चर्चेत देशात करोनाच्या तीन लाटा आल्या मात्र त्यात लहान मुलांना संक्रमण झाले तरी त्यांच्यात गंभीर लक्षणे न दिसल्याची बाब निदर्शनास आणून दिली गेली आहे. त्यामुळे तज्ञांचे या वयोगटाला करोना लस देण्याची गरज नसल्याचे म्हणणे आहे.

१२ ते १४ वयोगटाचे लसीकरण १६ मार्च पासून सुरु झाले असून १.६ कोटी मुलांना पहिला डोस दिला गेला आहे. १५ ते १७ वयोगटात ५.७ कोटी मुलांना पहिला डोस दिला गेला आहे. या लसीमुळे संक्रमणापासून बचाव होत नाही तर संक्रमण गंभीर स्वरूप धारण करत नाही असे दिसून आले आहे. लहान मुलांना संक्रमण झाले तरी त्यांच्यात गंभीर लक्षणे दिसलेली नाहीत आणि करोना मुळे १२ वर्षाखालील एकही मृत्यू नोंदविला गेलेला नाही. त्यामुळे या वयोगटाला लस देणे योग्य नाही असे मत मांडले जात आहे.