करोना कॉलर ट्यून मधून मिळणार मुक्ती

गेली दोन वर्षे सातत्याने फोन फिरवताच कानावर पडणाऱ्या करोना कॉलर ट्यून मधून आता मुक्ती मिळणार असल्याची वार्ता आली आहे. कितीही महत्वाचा कॉल असला तर फोन फिरवताच प्रथम काही काळ ऐकाव्या लागत असलेल्या या करोना ट्यून मुळे फोन युजर्स त्रासून गेले होते. दूरसंचार विभागाने त्यामुळे आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून आता करोना ट्यून काढून टाकली जावी अशी मागणी केली आहे. या करोना ट्यून मुळे दूरसंचार विभागाकडे फोन ग्राहकांच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात सातत्याने येत होत्या पण करोना संकट लक्षात घेऊन जनजागृती साठी ही ट्यून वाजणे सुरूच ठेवले गेले होते.

करोना महासाथ सुरु झाल्यावर करोना संदर्भात देशभरात जनजागृती व्हावी यासाठी करोना कॉलर ट्यून वाजविली जात होती तर करोना बाबत पुरेशी जागृती झाल्यावर लसीकरण करून घ्यावे यासाठी जनजागृतीचे काम करण्यासाठी कॉलर ट्यून वाजविली जात होती. पण यामुळे अनेकदा अगदी तातडीचे कॉल कनेक्ट होण्यास उशीर होत असे त्यामुळे ग्राहक त्रासून गेले होते. वास्तविक ट्यून सुरु होताच युजरने एक नंबर दाबला तर बरेचदा ही ट्यून बंद होत असे. पण आत्ता दूरसंचार विभागानेच या संदर्भात आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिले आहे शिवाय सेल्युअर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया कडेही करोना कॉलर ट्यून हटवा अशी मागणी केली आहे.

या पत्रात दूरसंचार विभाग म्हणतो,’ प्री कॉलर ट्यून सुरूच ठेवणे म्हणजे महत्वाच्या कॉल कनेक्टला उशीर करणे आहे. यामुळे मोबाईल नेटवर्क कॉल कनेक्ट होण्यास वेळ लागतो. आता या कॉलर ट्यूनची गरज संपुष्टात आली असून ती बंद करणे योग्य होणार आहे.