१२ ते १४ वयोगटाचे करोना लसीकरण सुरु

देशात करोनाचा उद्रेक खूपच नियंत्रणात आला असला तरी लसीकरण सुरूच राहणार आहे. १६ मार्च पासून लसीकरणाच्या पुढच्या टप्प्यात १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी जाहीर केले आहे. हे लसीकरण सुरवातीला सरकारी केंद्रांवरच होणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

‘मुले सुरक्षित तर देश सुरक्षित’ या नाऱ्याखाली लसीकरण सुरु केले जात असून केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीया यांनी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे ट्वीट केले आहे.  त्यासाठी कोविन अॅपवर नोंदणी करावी लागेल. या वयोगटासाठी बायोलॉजीकल ई कंपनीची ‘कार्बेवॅक्स’ लस दिली जाणार आहे. ३ जानेवारी पासून सुरु झालेल्या १५ ते १८ वयोगटासाठी भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस दिली गेली होती. आता ६० वर्षांपुढील कुणीही ज्येष्ठ व्यक्ती बुस्टर डोस घेऊ शकेल असेही जाहीर केले गेले आहे.

कार्बेवॅक्स ही दोन डोस लस असून २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस दिला जाणार आहे. सोमवारी केंद्राने राज्य सरकार आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांना त्या संदर्भातील सूचना पाठविल्या आहेत. देशात या वयोगटात ७.७४ कोटी मुले आहेत. कोविनवर नोंदणी करताना मोबाईल नंबर द्यावा लागेल. त्यानंतर ओटीपी येईल तो सांगावा लागणार आहे. आरोग्य सेतू मोबाईल अॅपवरही नोंदणी करता येणार आहे. १५ वर्षांपुढील ९५.५ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे या वेळी जाहीर केले गेले आहे.