गेल्या वर्षात महाराष्ट्रात थेट परदेशी गुंतवणूक घटली

महाराष्ट्र विधानसभेत गुरुवारी सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र आर्थिक सर्व्हेक्षण अहवालानुसार गेल्या वर्षात राज्यात थेट परकीय गुंतवणूक म्हणजे एफडीआय मध्ये मोठी घट झाली आहे. २०२०-२१ मध्ये राज्यात १.०२,८६६ कोटींची गुंतवणूक मिळवून कर्नाटकने प्रथम क्रमांक मिळविला आहे तर त्यापाठोपाठ १.०१,१४५ कोटींची गुंतवणूक मिळवून गुजराथ दोन नंबरचे राज्य बनले आहे. गेल्या वर्षात महाराष्ट्रात प्रत्यक्ष एफडीआय ४८,६३३ कोटींची असून गतवर्षी हा आकडा १,१९,७३४ कोटी रुपये होता.

राज्यात एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२१ या काळात एफडीआय ९,५९,७४६ कोटी होती, जी देशाच्या एकूण एफडीआयच्या २८.२ टक्के होती. उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या आकडेवारी नुसार एप्रिल ते डिसेंबर २०२१ मध्ये भारतात प्रत्यक्ष थेट परदेशी गुंतवणूक १६ टक्के कमी होऊन ४३.१७ अब्ज डॉलर्सवर आली होती. चालू वर्षाच्या सुरवातीच्या नऊ महिन्यात टी ६०.३४ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. या वर्षी महाराष्ट्राचा विकास दर १२.१ टक्के राहील असा अंदाज वर्तविला गेला आहे आणि त्यात सर्वाधिक योगदान सेवा क्षेत्राचे राहील असे संकेत मिळाले आहेत. या वर्षात राज्यात धान्य उप्तादन ३ टक्के वाढेल असाही अंदाज दिला गेला आहे.