या वर्षात अमेरिकेत वऱ्हाडीवाजन्त्र्यांची गर्दी, होणार २६ लाख विवाह

करोनाचा महाप्रलय ओसरू लागल्यावर आता अमेरिकेत या वर्षात विवाहाचा महापूर येत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या वर्षात म्हणजे २०२२ मध्ये अमेरीकेत तब्बल २६ लाख विवाह होणार आहेत. याचाच अर्थ या वर्षात अमेरिकेत वऱ्हाडी वाजंत्री यांची एकच गर्दी उसळणार आहे. गेल्या दोन वर्षात करोना उद्रेकामुळे सार्वजनिक कार्यक्रम होत नव्हते, अनेक प्रकारचे निर्बध लागू होते, यामुळे या काळात फारसे विवाह ठरले नाहीत. जे ठरले ते झाले नाहीत किंवा अगदी थोड्या प्रमाणात आणि मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले. काही विवाह गुगल मिट सारख्या माध्यमातून ऑनलाईन पार पडले.

आता मात्र करोनची काळी छाया बरीचशी निवळली आहे आणि निम्या जनतेचे लसीकरण झाले आहे त्यामुळे लग्नाळू, चतुर्भुज होण्याच्या तयारीला लागले आहेत. विवाहासाठी जागा, वेडिंग प्लॅनर्स याचे मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाले आहे. विवाह दिवसाचा आजपर्यंतचा ट्रेंड शनिवारी विवाह करण्याकडे असायचा कारण या दिवशी सुटी असते. या वर्षी मात्र वर्किंग डे दिवशी सुद्धा विवाह होत आहेत आणि दोन वर्षे घरात राहावे लागल्याने कंटाळलेली जनता वर्किंग डे दिवशी सुद्धा लग्नाला उपस्थित राहण्याच्या मूड मध्ये आहे. एका वेडिंग प्लॅनर कंपनीने या संदर्भात एक सर्व्हेक्षण केले असून त्यानुसार वर्किंग डे दिवशी विवाह करण्याच्या प्रमाणात यंदा ११ टक्के वाढ दिसून आली आहे.

यापूर्वी १९८४ मध्ये अमेरिकेत २६ लाख विवाह झाले होते. १९८४ मध्ये ब्रिटीश प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांचा विवाह झाला होता आणि त्यांच्या प्रभावामुळे अनेक जोडप्यानी याच वर्षात विवाह केले होते. दुसरे कारण म्हणजे १९८४ मध्ये एचआयव्ही रुग्णात वाढ होऊ लागली होती आणि त्यामुळेही रिलेशनशिप मध्ये राहण्याऐवजी अनेकांनी लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता असे समजते.