पियुष जैन याची जप्त रोकड बँकेत जमा- तासाला मिळतेय ७४२१ रु.व्याज
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर घालण्यात आलेल्या छाप्यातून मिळालेली १९७ कोटींची रोकड भारत सरकारच्या नावाने स्टेट बँकेकडे मुदत ठेव म्हणून जमा केली गेली असून या ठेवीवर स्टेट बँक, सरकारला तासाला ७४२१ रुपये व्याज देत असल्याचे समजते. जैन याच्या कानपूर आणि कनोज मधील घरातून हा पैसा जप्त करण्यात आला होता. डीजीजीआयने ९५ मोठमोठ्या पेट्यातून भरून ही रक्कम बँकेत जमा केली असेही सांगितले जात आहे.
मनी कंट्रोलने दिलेल्या बातमीनुसार या मुदत ठेवीवर स्टेट बँक ३.३ टक्के दराने व्याज देत आहे. त्याचा थेट फायदा सरकारला होणार असून व्याजपोटी सरकारी खजिन्यात जमा होणाऱ्या रकमेतून भविष्यात अनेक जनकल्याण कामे करता येणार आहेत. २७ डिसेम्बर रोजी जैन यांच्या कानपूर मधील घरातून १७७.४५ कोटी ची रोख रक्कम मिळाली होती तर कनोज येथील घरातून १९ कोटी रोख, २३ किलो सोने, ६०० लिटर चंदन तेल (किंमत अंदाजे ६ कोटी) मिळाले होते. कनोजच्या स्टेट बँकेतील जैन यांच्या लॉकर मधून ९ लाख रोख मिळाले होते.
पियुष जैन यांच्याकडे मिळालेले सोने तस्करीचे असावे असा संशय आहे. त्यादृष्टीने तस्करांबरोबर जैन यांचे काय संबंध होते याचा तपास सुरु आहे. हे सर्व सोने बिस्कीट स्वरुपात असून त्यावर इंटरनॅशनल प्रेशस मेटल रिफायनर्स शिक्का आहे. हे सोने सरकारी चॅनल मधून भारतात येऊ शकत नाही त्यामुळे ते तस्करी करूनच आणले गेले असावे असा शंशय आहे.