हॉंगकॉंग मध्ये करोनाचा कहर, मृतांच्या प्रेतांचा खच

हॉंगकॉंग या छोट्याश्या भागात गेल्या २४ तासात करोना मुळे ८३ मृत्यू झाले असून गेल्या आठवड्यात झालेल्या मृत्यूंची संख्या ३०० वर गेली आहे. आज येथे अशी परिस्थिती आहे कि हॉस्पिटल संक्रमितानी भरून वाहत आहेत तर दुसरीकडे मृतदेह ठेवण्यासाठी जागा उरलेली नाही. संक्रमितांच्या मृत्यूची संख्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचली आहे आणि पूर्ण भागात हॉस्पिटल मध्ये डझनावारी मृतदेह शवागारात जागा नसल्याने पडून राहिले आहेत. हॉस्पिटलच्या लॉबी संक्रमित रुग्णांनी भरल्या गेल्या आहेत.

पब्लिक डॉक्टर असोसिएशनचे प्रमुख डॉ. तेनी लिंग म्हणाले, येथे करोनाची स्थिती भयावह आहे, रोज संक्रमितांची संख्या वाढते आहे आणि अनेक रुग्ण घरातच दगावले आहेत त्यांची कोणतीही नोंद आमच्याकडे नाही. करोनावर नियंत्रणाचे सर्व उपाय फेल होत आहेत. शवागारात कर्मचारी कमी पडत आहेत.

हॉंगकॉंग मध्ये लस न घेतलेल्या जेष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. पैकी अनेकांनी लसीचे दुष्परिणाम होतील म्हणून लस घेतेलेली नाही तर २०२१ मध्ये देशाला करोना विषाणू नियंत्रणात राखण्यात यश आले होते त्यामुळे अनेकांनी लस घेतलेली नाही. हॉंगकॉंगची लोकसंख्या सुमारे ७४ लाख आहे. करोनाचा उद्रेक असाच सुरु राहिला तर मे मध्यापर्यंत मृतांची संख्या ३२०६ वर पोहोचेल असा अंदाज वर्तविला जात आहे.