ट्वीटर सीईओ पराग अग्रवाल पॅटर्नीटी लिव्हवर

ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या निमित्ताने पॅटर्नीटी लिव्हवर जात असल्याचे ट्वीट केल्यामुळे त्यांच्यावर अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर पॅटर्नीटी लिव्ह गरजेची आहे काय आणि असेल तर का यावरही सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पूर्वीच्या काळात नोकरी करणाऱ्या महिलांना बाळंतपण रजा मिळत असे. पण आता एकल कुटुंबे वाढल्याने मुलाच्या वडिलांना सुद्धा पॅटर्नीटी लिव्ह देण्याची पद्धत सुरु झाली असली तरी ती अजून फार रुळलेली नाही. परदेशात मात्र अशी पगारी रजा अनेक कंपन्या आणि सरकारी कार्यालयात दिली जाते.

बहुतेकवेळा नवजात बालक वडिलांना पाहून रडते. आईच्या पोटात वाढत असल्याने मुलाला आईची ओळख गर्भावस्थेपासून असते त्यामुळे जन्माला आल्यावर ते आईचा स्पर्श, आवाज ओळखते. वडिलाची ओळख मुलाला गर्भावस्थेपासून व्हावी, वडिलांशी त्याचे बॉंडिंग व्हावे तसेच बाळंतपणामुळे झालेल्या दमणूकीत आईला विश्रांती आणि मुलाला वडिलांची सोबत मिळावी यासाठी अशी पगारी रजा पुरुषांना दिली जाते.

भारतात केंद्र सरकार अशी पंधरा दिवसांची रजा पुरुषांना देते. खासगी कंपन्यात तसा खास नियम नाही. पण मिशो, फ्लिपकार्ट, रजरपे अश्या काही कंपन्या ही रजा देतात. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, मेघालय, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र, हिमाचल, बिहार, झारखंड राज्यात सुद्धा सरकार अशी रजां देते.

आजकाल हा ट्रेंड लोकप्रिय होत असून टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली, फेसबुकचा प्रमुख मार्क झुकेरबर्ग, सेरेना विलियम्सचा पती एलेक्सीस ओहानियान, बॉलीवूड अभिनेते शाहीद कपूर, सैफ अली खान, रितेश देशमुख यांनी यांच्या मुलांच्या जन्मावेळी अशीच पॅटर्नीटी लिव्ह घेतली होती.