नबाब मलिक यांच्या अटकेने सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्ष रस्त्यावर
मनी लाँड्रींग आणि कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीम यांच्याबरोबर कनेक्शन असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्राच्या महाआघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांना बुधवारी सायंकाळी ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालानालयाने अटक केल्यावर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजप आमनेसामने आले असून दोन्ही पक्ष रस्त्यावर निदर्शने करण्यासाठी उतरले आहेत.
केंद्र सरकार आणि ईडी विरोधात महाआघाडी कार्यकर्ते, नेते रस्त्यावर निदर्शने करत आहेत तर भाजपने राज्यभर नबाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा म्हणून सरकार विरोधात आंदोलन छेडले आहे. मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली असली तरी महाआघाडी सरकारने नबाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
शिवसेने प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मलिक यांना समर्थन दिले असून त्यासंदर्भात केलेल्या ट्वीट मध्ये राऊत म्हणतात,’महाआघाडीच्या सामने येण्याची हिम्मत नाही, मागून येऊन अफझलखानी युद्ध खेळत आहेत. कपट करून मंत्र्यांना आत टाकून आनंद मिळत असेल तर घ्या. आम्ही लढू आणि जिंकू. कंस, रावण मारले गेले तेच हे हिंदुत्व आहे.’
मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी व्यक्तींकडून मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपावरून मलिक यांची सात तास ईडीने चौकशी केल्यावर त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने मलिक यांना सात दिवसाची ईडी कोठडी दिली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून एखाद्या मंत्र्यावर गुन्हेगारी आरोप झाले असतील तर त्याने स्वतः हून राजीनामा दिला पाहिजे असा कायदा असल्याचे म्हणणे मांडले आहे.
मलिक कुटुंब मूळचे उत्तरप्रदेशातील असून १९७० मध्येच मुंबईत आले आहे. नबाब मलिक यांनी प्रथम व्यावसायिक म्हणून यश मिळविल्यावर मग राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी प्रथम समाजवादी पक्षातून निवडणुका लढविल्या आणि नंतर ते राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये सामील झाले. ते एकूण पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले असून त्यांनी मंत्रिपद सुद्धा भूषविले आहे.