सायबर गुन्हा तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबर बदलला

सायबर गुन्हे संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी पूर्वी जारी केलेला १५५२६० हा हेल्पलाईन नंबर बदलला आहे. आता हा नंबर १९३० असा झाला असल्याची माहिती सायबर दोस्ततर्फे गृहमंत्रालयाच्या ट्वीटर हँडलवर दिली गेली आहे.

जसजसा इंटरनेटचा वापर वाढतो आहे त्याच वेगाने सायबर फ्रॉडच्या घटना वाढत आहेत. सायबर ठग नवनव्या युक्त्या वापरून युजर्सना गंडा घालत आहेत. बँकांपासून तमाम वित्त सेवा पुरविणाऱ्या संस्था आणि सरकार वारंवार सायबर फ्रॉडबाबत काळजी घेण्याच्या सूचना ग्राहकांना देत आहेत आणि जागरूक राहण्याबाबत सावध करत आहेत तरीही मोठ्या प्रमाणावर असे गुन्हे घडत असल्याचे दिसून आले आहे.

दिल्ली पोलिसांनी सायबर क्राईमसाठी १९३० हा नंबर शेअर केला आहे. इंटरनेट संबंधित कोणताही गुन्हा या नंबरवर कॉल करून नोंदविता येईल शिवाय सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इनवर सुद्धा गुन्हा संदर्भात तक्रार नोंदविता येईल असे त्यांनी कळविले आहे. डीजीटायझेशन गुन्हे प्रमाण वाढले आहे. अनेकदा सायबर गुन्हेगार सोशल मिडीयाचा आधार घेऊन लोकांना फसवितात कारण बरेच लोक सोशल मिडीयावर बराच वेळ खर्च करतात.

सोशल मिडीयावर डिस्काउंटची लालूच दाखवून ग्राहकांना लुटणे हा फसवणुकीचा सर्वाधिक वापर होणारा मार्ग आहे. डिस्काउंट, लॉटरी, बक्षिसे जिंका अश्या जाहिराती यासाठी अनेकदा दिल्या जातात आणि सर्वसामान्य ग्राहक त्याला बळी पडतो. अश्या जाहिराती मध्ये काही शंकास्पद वाटले तर त्याची तक्रार पोलिसांत त्वरित द्यावी असे आवाहन केले जात आहे. ऑनलाईन खरेदी करताना शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडावा असाही सल्ला दिला जातो कारण यामुळे ग्राहकाचे बँक डिटेल सायबर गुन्हेगाराच्या हाती जात नाहीत.