महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूची चटक

महाराष्ट्रात तरुण वर्गापाठोपाठ शालेय विद्यार्थ्यात सुद्धा तंबाखू सेवन प्रमाण वाढत चालले असल्याचे ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हे चार मध्ये समोर आले आहे. शालेय विद्यार्थ्यात तंबाखू अथवा अन्य तंबाखू उत्पादने सेवनाचे प्रमाण ५.१ टक्के आहे आणि विशेष म्हणजे यात विद्यार्थिनींची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. हे पदार्थ शाळेजवळ दुकाने, पान टपऱ्यांवर मुलांना सहज उपलब्ध होत आहेत असेही त्यात नमूद केले गेले आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात किशोर गटात धुम्रपानाचे प्रमाण जास्त असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.

गुरुवारी ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हे चारचा अहवाल राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी टाटा मेमोरियल मध्ये सादर केला. या सर्व्हेक्षणात ३५ शाळांमधील ४३६० विद्यार्थी सामील होते. त्यातील ५.१ टक्के विद्यार्थ्यांनी तंबाखू, सिगारेट सेवन करत असल्याची कबुली दिली. त्यात विद्यार्थिनी सुद्धा सामील आहेत. राज्यातील ३३ हजार शाळा तंबाखू मुक्त घोषित केल्या गेल्या असून नियमानुसार शाळेपासून १०० मीटरच्या आत या पदार्थांच्या विक्रीला बंदी आहे. हा नियम मोडल्यास दंड होतो आणि गेल्या पाच वर्षात दंडापोटी मोठी रक्कम वसूल केली गेल्याचेही सांगितले जात आहे.

२०१६ मध्ये नियम मोडल्यामुळे १ लाख रुपयाचा दंड वसूल केला गेला होता. २०२१-२२ मध्ये ही रक्कम ५.५ कोटींवर गेली असल्याचे समजते.