मार्च अखेरी भारतातून संपणार करोना

मार्च नंतर भारतातून  करोना संपण्याची शक्यता असल्याचे संकेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिले गेले आहेत. देशातील संक्रमणाची आकडेवारी पाहता देशातील करोनाची तिसरी लाट मार्च अखेर संपुष्टात येईल आणि चौथी लाट येण्याची शक्यता जवळ जवळ नाही असे आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले. जेथे जेथे जगात लसीकरण कमी झाले तेथे करोनाच्या नवीन व्हेरीयंटच्या आणखी लाटा येऊ शकतात पण भारतात ती शक्यता नगण्य असल्याचे मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

देशातील करोनाच्या तिसऱ्या लाटेतील आकडेवारी तपासली गेल्यावर भारतातून करोना संपेल अशी शक्यता वर्तविली गेली आहे. भारतात तिसरी लाट तीव्र होती पण जास्त घातक नव्हती. याला ठोस वैज्ञानिक कारणे आहेत असे आरोग्य अधिकारी म्हणाले. हीच कारणे देशात करोनाची चौथी लाट रोखण्यास मदत करणार आहेत. भारतात तिसऱ्या लाटेत अन्य देशांच्या तुलनेत संक्रमितांची संख्या कमी होती. संक्रमिताना रुग्णालयात भरती करावे लागल्याचे प्रमाण सुद्धा कमी होते आणि मृत्यूदर सुद्धा कमी होता. भारतात मोठ्या संखेने नागरिकांच्या मध्ये हायब्रीड इम्युनिटी आली आहे. तिसऱ्या लाटेनंतर इम्युनिटी अधिक मजबूत झाली आहे असे जाणकार डॉक्टर सांगत आहेत.

करोना बचावासाठी दोन प्रकारची इम्युनिटी ग्राह्य धरली जाते. एक संक्रमण झालेल्या लोकात नैसर्गिक पणे निर्माण होणारी इम्युनिटी आणि दुसरी लस घेतल्याने शरीरात तयार होणारी इम्युनिटी. लस घेऊनही ज्यांना करोना संसर्ग झाला त्यांच्या शरीरात तयार होणाऱ्या इम्युनिटीला हायब्रीड इम्युनिटी म्हटले जाते. हीच इम्युनिटी करोना पासून बचाव करणार आहे असे डॉक्टर सांगतात.

जानेवारी २०२१ मध्ये घेतल्या गेलेल्या पहिल्या सिरो सर्व्हे मध्ये ७ टक्के लोकात संक्रमण झाले होते म्हणजे ९३ टक्के जनतेला संक्रमणाचा धोका होता. पण लसीकरण सुरु झाल्याने दुसऱ्या लाटेत ६७ टक्के संक्रमित झाले. आता देशात १५ ते १८ वयोगटाला लस दिली जात आहे. त्यानंतर तिसरे सिरो सर्व्हेक्षण झालेले नाही पण त्या काळात ओमिक्रोनचे नव्याने संक्रमण झाल्याने देशात मोठ्या प्रमाणावर हायब्रीड इम्युनिटी तयार झाल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला गेला आहे.