घोस्ट हंटरनी कॅमेऱ्यात टिपले खरे भूत

भुताच्या गोष्टी ऐकायला किंवा वाचायला आणि त्याविषयी चर्चा करायला अनेकांना आवडते. पण अश्या चर्चा झाल्यावर एकटे दुकटे कुठे जायची यायची वेळ आली तर मात्र अनेकांची तंतरते याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. भूत खरोखर असते का याविषयी अनेक प्रवाद आणि वाद आहेत. पण ब्रिटनच्या लिंकनशायर येथे खरे भूत दिसल्याची घटना घडल्याचे वृत्त ‘द मिरर’ ने दिले आहे.

या बातमीनुसार ब्रिटनच्या घोस्ट हंटर ग्रुप ‘द रीटफोर्ड घोस्ट हंटर’ ने लिंकनशायर रॉयल एअरफोर्स बेसवर त्यांचा सामना खऱ्या भूताशी झाल्याचा दावा केला असून कॅमेऱ्यात भूत टिपले गेल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर ओढविलेल्या प्रसंगाने अनेकांना अचंब्यात टाकले आहे. ही टीम भुताच्या शोधात या बेसवर आली होती. या बेस परिसरात राहणाऱ्या लोकांनी कॅथरीन बायस्टॉक नावाच्या मुलीचे भूत येथे दिसते आणि अनेक वर्षे ते येथे आहे आणि नागरिकांना त्रास देते अशी माहिती दिली होती.

त्यानुसार ही घोस्ट हंटर टीम लाइव स्ट्रीमिंग करत असताना कॅथरीनचे भूत रस्त्याकडेला दिसले. तिच्या हातात सिगरेट होती आणि पाहता पाहता हे भूत कार समोर आले. त्याबरोबर कारचे लाईट अपोआप विझले आणि एक विचित्र प्रकाश पसरला असा अनुभव त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. रिपोर्ट नुसार १९४७ मध्ये कॅथरीन आणि तिचा मित्र यांना येथे अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या दोघांचेही भूत येथे दिसते असे सांगितले जाते. कॅथरीन मदत मागते पण तिला मदत करणे म्हणजे संकटाला आवाहन करणे असल्याचे येथील रहिवासी सांगतात.