पासपोर्ट विषयी काही रोचक माहिती

एका देशातून दुसऱ्या देशात जाताना कुणाही प्रवाशाला सर्वात जरुरी असतो तो पासपोर्ट. व्यक्तीची ओळख आणि नागरिकत्व पटविणारे हे डॉक्युमेंट अति महत्वाचे आहे. प्रत्येक देशाचा पासपोर्ट वेगळा असतो. पण या पासपोर्ट बाबत काहीशी रोचक किंवा वेगळी माहिती बहुतेकांना नसते.

आज पासपोर्टवर फोटो अनिवार्य आहेच पण तोही विशिष्ट पद्धतीने, डार्क बॅकग्राउंडवर काढलेला, ठराविक आकाराचा असावा लागतो. पण सुरवातीला म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या आधी पासपोर्टवर फोटो असण्याची गरज नव्हती. पहिल्या महायुद्धानंतर पासपोर्टवर फोटो आला. १९१५ च्या काळात ब्रिटन मध्ये पासपोर्टवर सर्व कुटुंबाचा एकत्र फोटो असे. त्यात कोण कसा आणि कुठे बसलाय याला महत्व नव्हते मात्र सर्वांचे चेहरे स्पष्ट दिसले पाहिजेत अशी अट असायची.

पासपोर्टची संकल्पना राजा हेन्री पाचवा याने आणली असे सांगतात. अर्थात तेव्हा याला पासपोर्ट असे नाव नव्हते. परदेशी भूमीवरून प्रवास करून आलेल्या लोकांचे राष्ट्रीयत्व आणि ओळख पटावी अशी त्यामागची कल्पना होती त्यामुळेच या कागदाला पासपोर्ट नाव नसले तरी त्याचा उद्देश तोच होता.

अमेरिकेत तुम्ही चेहऱ्यावर सर्जरी केली असेल किंवा टॅटू काढला असेल तर तुम्हाला नवा फोटो काढून त्यासह पुन्हा पासपोर्ट काढावा लागतो. इतकेच नव्हे तर तुमचे वजन खूप वाढले किंवा खूप कमी झाले असेल तर नव्याने फोटो काढून नवा पासपोर्ट काढावा लागतो. ब्रिटीश पासपोर्ट महाराणी एलिझाबेथच्या नावाने दिला जातो. राणीला जगभर कुठेही प्रवास करताना पासपोर्टची गरज नाही. मात्र राणीकडे काही विशेष कागदपत्रे  असतात. ब्रिटीश राजघराण्यातील अन्य सर्व व्यक्तींना मात्र पासपोर्ट काढावा लागतो.