सदाबहार अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ६० वर्षाची कारकीर्द गाजविलेले सदाबहार, रसिकमान्य अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. ३० जानेवारी रोजीच त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यांनी शेकडो मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या मागे पत्नी अभिनेत्री सीमा देव, अभिनेता मुलगा अजिंक्य, निर्माता दिग्दर्शक मुलगा अभिनय, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रमेश देव यांच्यावर विलेपारले येथील स्मशानभूमीत आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

कोल्हापूर मध्ये जन्मलेल्या रमेश देव यांनी १९६२ मध्ये ‘’वर दक्षिणा’ या मराठी चित्रपटात प्रथम भूमिका साकारली होती तर आरती हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. विशेष म्हणजे वरदक्षिणा मध्ये त्यांच्या सोबत सीमा यांनीच भूमिका केली होती आणि याचवेळी त्या दोघांचे प्रेम जमले आणि त्यांनी विवाह केला होता. त्यांच्या विवाहाला या वर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे दर वर्षी विवाहाच्या वाढदिवशी रमेश सीमा यांना काही तरी नवे गिफ्ट आठवणीने देत असत असे त्यांचे निकटवर्ती सांगतात.

दीर्घकाळ चित्रपट सृष्टीत काम करताना रमेश देव यांनी सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या. नायक, खलनायक, सह अभिनेता, विनोदी अश्या कुठल्याही भूमिका ते सहज साकारत असत. त्यांनी अमिताभ बच्चन, राजेश खन्न, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांनी २८० चित्रपटातून भूमिका साकारताना स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. चित्रपटाबरोबरच त्यांनी नाटके, टीव्ही सिरीयल, जाहिराती अश्या सर्व क्षेत्रात अभिनय केला.

सुवासिनी, आंधळा मागतो एक डोळा, जगाच्या पाठीवर, जेता, आनंद असे अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी दिले. वेळ पाळण्याबाबत ते अतिशय काटेखोर होते. दोन वर्षापूर्वी एका कार्यक्रमात रमेश देव आणि सीमा बरोबर होते तेव्हा ‘सूर तेच छेडीता’ हे गाणे सुरु झाल्याबरोबर त्यांनी वयाच्या नव्वदीत अफलातून नृत्य केले होते त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल झाला होता.