माहीची नवी इंनिंग, सुपरहिरो अवतारात देणार दर्शन

टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी उर्फ माही आता क्रिकेटमैदानाबाहेरील नव्या इनिंग साठी सज्ज झाला असल्याचे धोनीने शेअर केलेल्या एका व्हिडीओतून समोर आले आहे. ग्राफिक नॉव्हेल ‘अथर्व, द ओरिजिन’ या वेबमालिकेचा एक टीझर धोनीने शेअर केला असून त्यात तो महादेवाप्रमाणे डोक्यावर जटा, गळ्यात माळा अश्या अवतारात दिसत आहे. थोडक्यात माही सुपरहिरोच्या रुपात लवकरच दर्शन देणार आहे. हा टीझर माहीच्या चाहत्यांना फारच भावला आहे. या निमित्ताने माही ग्लॅमर जगतात नवा डाव खेळायला तयार आहे.

धोनीने या भूमिकेचा फर्स्ट लुक शेअर केला असून त्यात धोनी अॅनिमेटेड रुपात दिसेल. या पौराणिक सायन्स फिक्शन वेब सिरीजची निर्मिती धोनी एन्टरटेनमेंट तर्फे केली जात असून साक्षी धोनी या कंपनीची व्यवस्थापकीय संचालक आहे. माहीने त्याच्या फेसबुक अकौंटवर शेअर केलेल्या टीझर मध्ये धोनी रौद्र रुपात दुष्ट, राक्षसांशी भिडताना दिसत आहे. धोनी म्हणतो, ‘अथर्व, द ओरिजिन’ चा टीझर लाँच करताना खूप आनंदात आहे. असे सांगितले जाते कि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून २०१९ ला निवृत्ती घेतल्यावर माही नवीन क्षेत्राचा शोध घेत होता. अथर्व हा त्याचाच एक भाग आहे. या कथेचे लेखक आहेत रमेश थमीलमनी. पौराणिक सुपरहिरो वर ते दीर्घकाळ काम करत होते असे समजते.